लातूर : प्रतिनिधी
लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजीवन मिस्कले यांच्या नेतृत्वातील पथकाने लातूरच्या सुत मील रोड परिसरात मोठ्या शिताफीने धाड टाकून ड्रग तस्करी करणा-या महिलेसह चौघा जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून १६.३६ किलो ग्रॅम वजनाचे एम.डी. ड्रग पावडर व मोबाईल असा एकूण २ लाख ८२ हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. लातूर पोलिसांकडून ड्रगची करण्यात आलेली ही पहिलीच कारवाई असण्याची शक्यता आहे.
लातूरच्या सुत मील रोड परिसरात एका पाणीपुरी स्टॉलच्या शेजारी कोणीतरी एम. डी. ड्रग पावडर खरेदी करण्यासाठी येत आहेत. याची खबर लागताच स्थानीक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक घटनास्थळी गेले, तेंव्हा दोघेजन एका महिलेकडून एम. डी. ड्रग खरेदी केल्याचे आढळून आले. त्यांना ताब्यात घेतले,त्यांची जागेवरच झडती घेतली असता त्यांच्याकडे एम. डी. ड्रग पावडर आढळून आले. हे त्यांनी कोठून घेतले, अशी त्यांच्याकडे विचारणा केली असता त्याच ठिकाणी एका घरामध्ये राहत असणा-या महिलेकडून घेतल्याचे कबुल केले. पोलिसांनी तालुका दंडाधिकारी यांचा एक प्रतिनिधी, वजन मापे विभागाचा एक प्रतिनिधी, पंच घेवून त्या महिलेच्या घरात प्रवेश करून विचारणा केली असता त्या महिलेने एम. डी. ड्रग आपण विक्री केल्याचे व विक्रीसाठी जवळ बाळगल्याचे कबुल केले. पुणे येथे राहणारा तिचा नवरा पत्नीच्या मार्फत एम. डी. ड्रग पावडर विक्री करीत असल्याचे सिद्ध झाले. पोलिसांनी या प्रकरणी १६.३६ किलोग्रॅम वजनाची ड्रग पावडर, चार मोबाईल, वजनकाटा असा एकूण २ लाख ८२ हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
एम. डी. ड्रग विक्री करणारी माया अनुप सोनवणे तसेच हिच्याकडून एम. डी. ड्रग खरेदी करणारा ऋषीकेश शेषेराव राठोड रा. नाथनगर लातूर, संयम बालाजी पडीले रा. बीदररोड उदगीर यांना पोलिसांनी अटक केली. तर माया अनुप सोनवणे यांच्यामार्फत ड्रगची विक्री करणारा व ड्रग उपलब्ध करून देणारा अनुप नवनाथ सोनवणे रा. निगडी पुणे हा. मु. सुत मील रोड लातूर याच्यासह लातूरच्या शिवाजीनगर पोलिसांत चौघा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वी चाकूर तालुक्यामध्ये अशा स्वरूपाचे ड्रगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, पण तो मुंबईच्या पथकाने. लातूरच्या पोलिसांनी ड्रग प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. याबाबत पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, पोलीस कर्मचारी भोंग, सुरवसे, धारेकर, हाके, डांगे, सौदागर, भोसले, खोसे, निटुरे, चोपने आदिंच्या पथकाने ही कारवाई
केली.