15.2 C
Latur
Wednesday, January 7, 2026
Homeमहाराष्ट्रलातुरात भाजपा निष्ठावंत आघाडीने ठोकला शड्डू

लातुरात भाजपा निष्ठावंत आघाडीने ठोकला शड्डू

भाजपात बंड, निष्ठावंत भाजपा आघाडीचे २८ उमेदवार रिंगणात
लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर भाजपामध्ये तिकिट वाटपावरून तीव्र नाराजी उफाळून आली. अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करणा-या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी उघडपणे बंडाचे निशाण फडकावले. ‘आम्हीच खरे भाजपवाले’, असा ठाम दावा करत, बाहेरच्या पक्षातून आलेल्या ‘आयाराम’ उमेदवारांना तिकिट देण्यात आल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. दुसरीकडे जनसंघापासून पक्ष वाढविणारे जुने कार्यकर्ते तिकिटापासून वंचित राहिल्याने असंतोष अधिक तीव्र झाला. या असंतोषातूनच २८ निष्ठावंत भाजपावाल्यांची भाजपा निष्ठावंत आघाडी लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणूक मैदानात उतरली आहे. त्यामुळे भाजपाची पुरती कोंडी झाली.

भाजपा_ निष्ठावंत आघाडीच्या उमेदवारांच्या यादीत प्रभाग क्रमांक १५ मधून विजयालक्ष्मी रंदाळे, स्मिता गणेश हेड्डा, श्रीनिवास लांडगे, वल्लभ वावरे, प्रभाग क्रमांक ८ मधून पृथ्वीसिंह बायस, साधना सिसोदिया, श्रीकांत रांजणकर, प्रभाग क्रमांक १० भरत हणमंतराव भोसले, प्रभाग क्रमांक ९ वंदना राजेंद्र वनारसे, राहुल साबळे, प्रभाग क्रमांक १२ सुवर्णा हावा पाटील, शोभाताई सोनकांबळे, प्रभाग क्रमांक १७ साळुंके प्रतिक्षा विवेकानंद, प्रभाग क्रमांक ६ क झंवर नंदिनी महेश यांच्यासह २८ उमेदवारांचा समावेश आहे.

आमदार संभाजी पाटील यांच्यावर गंभीर आरोप
लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत निवडणूक प्रचार प्रमुख संभाजी पाटील निलंगेकर यांनी आयत्या वेळेस भाजपामध्ये येणा-यांना पैसे घेऊन उमेदवारी दिली. एका रात्रीत प्रवेश आणि लगेच तिकिट, असा प्रकार घडल्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांना तिकिटापासून वंचित राहावे लागत असल्यामुळे निष्ठावंत कार्यकर्ते अपक्ष म्हणून निष्ठावंत भाजपा अशी आघाडी करत निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे ही निवडणूक निष्ठावंत भाजपाविरुद्ध बोगस भाजपा, अशी होणार असल्याचे निष्ठावंतांचे म्हणणे आहे.

शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी
अजित पवार गटाशी समझोता!
भाजपा_ निष्ठावंत _आघाडी शिवसेना एकनाथ शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष यांच्याशी समझोता करणार आहे. त्या अनुषंगाने दोन्ही पक्षांच्या प्रमुखांशी प्राथमिक बोलणी सुरू आहे. ज्या प्रभागात या दोन पक्षांचे उमेदवार असतील, त्या प्रभागात भाजपा_ निष्ठावंत _आघाडीचा उमेदवार नसेल आणि ज्या प्रभागात भाजपा_ निष्ठावंत _आघाडीचा उमेदवार असेल, त्या प्रभागात या २ पक्षाचा उमेदवार नसेल, असे सूत्र ठरणार असल्याची माहिती संजय शेटे यांनी दिली.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR