लातूर : प्रतिनिधी
येथील सरस्वती संगीत कला महाविद्यालय आणि मराठवाडा संगीत कला अकादमी व रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त्त विद्यमाने ‘हर घर संगीत, घर घर संगीत’ हे संगीत प्रसाराचे उदात्त ध्येय घेऊन गाणं शिकून ‘तानसेन’ तयार होवो न होवो परंतु संगीत रसिक जागृती नोंदणी या अभिनव उपक्रमामुळे संगीत जगताला निश्चितच उत्तम ‘कानसेन’ मिळेल. या भूमिकेतून मराठवाडा संगीत कला अकादमीचे अध्यक्ष तालमणी डॉ. राम बोरगावकर यांनी लातूर शहर व परिसरातील दहा हजार रसिकांची नोंदणी करण्याचे ध्येय ठेवले आहे. नुकतेच आरसीसीच्या मंचावर या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन प्रा. शिवराज मोटेगावकर, तुकाराम पाटील, प्रभारी प्राचार्य डॉ. सुदाम पवार यांच्या हस्ते झाले.
सध्याच्या युगात सर्वच वयोगटातील लोकांमध्ये ताण- तणावाची पातळी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. हे सर्व ताण-तणाव टाळण्यासाठी संगीत ऐकणं खूप महत्त्वाचे ठरते. संगीत श्रवणातून ताण कमी होतो आणि प्रत्येक मनुष्याला सकारात्मक ऊर्जा मिळते. संगीत कलेच्या साधनेतून मनातील भावना व्यक्त्त करता येतात, तणावरहित जीवन जगण्यासाठी संगीत ऐकणे आणि गायन, वादन कला अवगत करुन आपले मन शांत आणि तणावमुक्त्त व्हावे या उद्देशाने डॉ. राम बोरगावकर यांनी सुरु केलेल्या या अभियानामध्ये आपणही सर्वांनी नोंदणी करून भावी काळात लातूर शहर व परिसरात होणा-या विविध संगीत उपक्रमास आपला सहज सहभाग नोंदविता यावा यासाठी संगीत रसिक जागृती अभियानामध्ये जास्तीत जास्त संगीत रसिकांनी बाळू आडगळे मो. नं. ९९६०२२९०३७ आणि प्रा. श्रीमंत दोरवे मो. नं. ९७३०२१८४१० यांच्याशी संपर्क साधून आपली विनाशुल्क नोंदणी करावी, असे आवाहन तालमणी डॉ. राम बोरगावकर यांनी केले आहे.