लातूर : प्रतिनिधी
भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभर संविधान गौरव अभियान राबविण्यात येणार असून त्या अनुषंगाने लातूर जिल्ह्यातही हे अभियान राबवले जात असून लातूर शहरात संविधान गौरव सभेचे आयोजनही करण्यात येणार असल्याची माहिती भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्या तथा संविधान गौरव अभियान समितीच्या सदस्या प्रेरणाताई होनराव यांनी मंगळवारी सकाळी लातुरात पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
संविधान गौरव अभियानाच्या निमित्ताने राज्यात सर्वच जिल्हास्थानी संविधान गौरव सभाही होणार आहेत. त्यासाठी राष्ट्रीय तसेच प्रदेश पातळीवरील मान्यवर नेत्यांची उपस्थिती राहणार असल्याचे सांगून प्रेरणाताई होनराव यांनी ठाण्यात होणा-या संविधान गौरव सभेस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून पुण्यात ज्योतिरादित्य शिंदे, नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संविधान गौरव सभा होईल. राज्यात ठिकठिकाणी मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत या सभा पार पडणार आहेत.
त्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी निबंध, वक्तृत्व स्पर्धांचेही आयोजन केले जाणार आहे. विविध शैक्षणिक उपक्रमही त्या अनुषंगाने राबवले जाणार आहेत. यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, प्रा. पंडितराव सूर्यवंशी, संजय सोनकांबळे, रत्नमाला घोडके, माजी नगरसेविका आल्टे यांची उपस्थिती होती.