लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने सन २०२४-२५ चे सुधारित व सन २०२५-२६ चे मूळ अंदाजपत्रक तयार केले जात आहे. हे अंदाजपत्रकह्यायार करताना लातूरकरांच्या मनात काय आहे? हे जाणून घेत त्यांच्या सूचना मागविण्यात आलेल्या होत्या. नागरिकांनी सूचनाही दिल्या. आता प्रतिक्षा आहे ती अर्थसंकल्पाची. विशेष म्हणजे नागरिकांनी केलेल्या सूचनांचा बजेटमध्ये अंतर्भाव व्हावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
लातूर शहर महानगरपाकिलेच्या अंदाजपत्रकामध्ये शहरातील नागरिकांचा सहभाग असावा, या हेतूने महानगरपालिका गेल्या काही वर्षांपासून नागरिकांकडून सूचना मागवित आहे. याही वर्षी तशा सूचना मागविण्यात आलेल्या आहेत. शहरातील नागरिक, सामाजिक संघटना,ज्येष्ठ नागरिकांनी अंदाजपत्रकासाठी सूचना पाठवाव्यात, असे मनपाला अपेक्षित होते. त्यानूसार मनपाच्या उत्पन्नात वाढ, खर्चात बचत, सेवा- सुविधांमध्ये सुधारणा तसेच शहराच्या विकासात्मक दर्जात वाढ करण्यासाठी असंख्य नागरिक दि. ४ फेबु्रवारीपर्यंत सूचना केलेल्या आहेत. मनपाचे अंदाजपत्रक सर्वसमावेशक व नागरिकाभिमुख करण्यासाठी नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे. मनपाच्या अपेक्षेपेक्षाही अधिक नागरिकांनी यात सहभागी होत आपल्या सूचना पाठविलेल्या आहेत. त्यात रस्ते, पाणीपुरवठा, पथदिवे, ग्रीन बेल्टेचे सुशोभीकरण, हॉकर्सझोन आदींबाबत सर्वाधिक सूचना आल्याची अधिकृत सूत्रांकडून कळते.
गतवर्षी मनपाने सादर केलेल्या अंदाजपत्रकात पाणीपुरवठा योजनेसाठी ५० लाख रुपये, विद्युत विभागातील साहित्य खरेदी व देखभाल दुरुस्तीसाठी ४० लाख रुपये तसेच पथदिवे व वीज बिलासाठी २ कोटी रुपयांची तरतूद केली होती. शहरात एलईडी दिवे बसवण्यासाठी ५० लाख तर ट्रॅफिक सिग्नल देखभाल व दुरुस्तीसाठी १५ लाख रुपयांची तरतूद केली होती. रुग्णालय व दवाखान्यांसाठी ३१ लाख खर्च अपेक्षित होता. मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी कोंडवाड्यावर ६६ लाख ५० हजार रुपये खर्च अपेक्षीत होता तर सार्वजनिक उद्यानासाठी एक कोटी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती.
बांधकाम विभागात रस्ते व गटार दुरुस्तीसाठी दोन कोटी, शैक्षणिक विषयासाठी दोन कोटी ७४ लाख ८० हजार रुपये तर ग्रंथालयांसाठी दोन कोटी २४ लाख २० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती. लातूर शहर महानगरपालिकेच्या उत्पन्नाच्या बाबी अत्यंत मर्यादीत आहेत. आर्थिक परिस्थिती व वस्तुस्थिती लक्षात घेऊन कोणत्याही स्वरुपाची करवाढ किंवा नवीन करांचा बोजा न टाकता महानगरपालिकेचा २०२४-२५ चा अर्थसंकल्प सादर केला होता. या वर्षीही याच बाबी लक्षात घेऊन अर्थसंकल्प सादर होईल, अशी लातूरच्या नागरिकांची अपेक्षा आहे.