28.8 C
Latur
Thursday, March 13, 2025
Homeलातूरलातूरकरांनी अनुभवला कृषी संस्कृतीचे दर्शन घडविणारा संगीत सोहळा

लातूरकरांनी अनुभवला कृषी संस्कृतीचे दर्शन घडविणारा संगीत सोहळा

लातूर : प्रतिनिधी
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने लातूर येथील दयानंद सभागृहात १२ ते १४ मार्चदरम्यान सायंकाळी ५ ते रात्री ८ या कालावधीत कृषि संस्कृती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे जल्लोषात उद्घाटन करण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रमेश जाधव, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे प्रकल्प संचालक शिवसांब लाडके, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे, दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, कवयित्री शैलजा कांरडे, प्रमोद जोशी, प्रा. अनिल माळी, अनिल पुरी, समन्वयक बी. एम्. घोलप यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
कृषी संस्कृतीचे दर्शन घडविणा-या आकर्षक मंचावर सादर झालेल्या गीतांनी उपस्थितांची मने जिंकली. सासुरवाशीण महिलेला असलेली ओढ व तिनं जात्याच्या ओव्यातून मांडलेल्या आपल्या भावना आणि ‘माळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी जातं…’, ‘ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे…’, ‘जीवा शिवाची बैलजोड…’ यासारखी ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारी एकापेक्षा एक सरस गाणी लोकप्रिय गायक डॉ. अभिजित कोसंबी, प्रसेनजीत कोसंबी, गायिका प्रज्ञा अन्नम, प्रणाली कदम यांनी व त्यांच्या चमूने सादर केली. या गीतांना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. ‘गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी…’ या लोकगीताने प्रेक्षकांची मने जिंकली.  यासोबतच गवळण, जात्यावरच्या ओव्या, भक्तीगीते, कृषि संस्कृतीचे दर्शन घडविणारी मराठी चित्रपट गीते यावेळी सादर करण्यात आली. निवेदक सुशील मिस्त्री यांच्या प्रभावी सूत्रसंचालनाने या कार्यक्रमाची रंगत वाढविली.
लातूर येथे पहिल्यांदाच होत असलेल्या कृषी संस्कृती महोत्सवामुळे लातूर जिल्ह्यातील नागरिकांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. १३ व १४ मार्च रोजीही सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत दयानंद सभागृहात हे कार्यक्रम होणार आहेत. सर्व कार्यक्रमांना प्रवेश नि:शुल्क असून राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आयोजित या कृषि संस्कृती महोत्सवामध्ये लातूर जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे  प्रकल्प संचालक श्री. लाडके आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अ‍ॅड. गोजमगुंडे यांनी यावेळी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR