26.7 C
Latur
Friday, May 9, 2025
Homeलातूरलातूरकरांसाठी आदिवासी संगीत यात्रा

लातूरकरांसाठी आदिवासी संगीत यात्रा

लातूर : प्रतिनिधी
भारतीय आदिवासी वा लोकसंगीताचे दर्शन घडवण्यासाठी स्वामी रामानंदतीर्थ व्याख्यानमालेने भारतीय संगीत क्षेत्रातील शिक्षिका, संशोधक व गायक प्राची माया गजानन यांना आमंत्रित केले आहे. प्राची या भारताच्या मूळ संगीत परंपरेच्या वारशाचे जतन आणि प्रचार करण्याचे कार्य करत आहेत. दि. ११ मे रोजी सायंकाळी ६ वाजता शहरातील श्रीकिशन सोमाणी विद्यालयाच्या कस्तूर-कंचन सभागृहात प्राची या कथा आणि गिते सादर करणार आहेत.
प्राची या भारताच्या दुर्गम भागांत जाऊन आदिवासी संगीताचे संकलन करून त्यांची महती उलगडून दाखवत आहेत. त्यांचे ‘आदिवासी संगीत विचार’ हे पुस्तक सिमला येथील ‘इंडियन इंस्टीट्युट ऑफ अ‍ॅडव्हान्स स्टडीज’ यांनी प्रकाशित केले असून ते भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मूजींना भेट दिले आहे. या पुस्तकाचे भारतातील आदिवासी, सांगीतिक
आणि शैक्षणिक वर्तुळात उत्साहाने स्वागत केले जात आहे. प्राची यांनी संपूर्ण भारतात व परदेशात अनेक संगीत मैफिली सादर केल्या आहेत आणि त्यांच्या नावावर अनेक सीडीज व अल्बम्स आहेत. त्यांना सर सी. व्ही. रमन पुरस्कार, कलेश्वरी सन्मान, म्युझिक फोरम पुरस्कार ह्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
तसेच त्यांना ‘इंडियन इंस्टीट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स स्टडीज’ ‘टाटा फेलोशिप इन फोल्कलोर’ आणि भारत सरकारकडून ‘सांस्कृतिक फेलोशिप’ प्राप्त झाल्या आहेत. विदुषी प्राची माया गजानन ह्या आदिवासी संगीताची निर्मिती होतानाच्या कथा आणि गीते यांतून ‘आदिवासी संगीत यात्रा’ घडवणार आहेत. दि. ११ मे रोजी सांयकाळी ६ वाजता श्रीकिशन सोमाणी विद्यालयाच्या कस्तूर-कंचन सभागृह येथे होत असलेल्या अशा वैशिष्ट्यपूर्ण मैफिलीचा लाभ रसिकांनी घ्यावा, असे आवाहन स्वामी रामानंदतीर्थ व्याख्यानमालेच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR