लातूर : प्रतिनिधी
राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे होणा-या ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी मुंबईत दि. १७ फेब्रुवारी ते १५ मार्च या कालावधीत होणार आहे. यात लातूरमधील ‘परफेक्ट मिसपॅच’ या नाटकाचा समावेश झाला आहे. या नाटकाचा दि . १८ फेब्रुवारी रोजी रंगशारदा नाट्यमंदिरात प्रयोग सादर होणार आहे.
लातूरच्या केंद्रावर दि. ४ ते १७ डिसेंबरदरम्यान स्पर्धेची प्राथमिक फेरी झाली. यात ‘परफेक्ट मिसपॅच’ ने प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यामुळे या नाटकाची अंतिम फेरीमध्ये निवड झाली आहे. प्राथमिक फेरीत मर्यादीत नाटकांचा समावेश असल्यामुळे अंतिम फेरीत एकाच नाटकाचा समावेश होऊ शकला. सुधाकर कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठानचे हे नाटक असून हिमांशू स्मार्त यांनी लेखन केले आहे. संजय अयाचित यांनी दिग्दर्शन केले आहे. हे द्विपात्री नाटक असून मुकुंद भिसे आणि भाग्यश्री कुलकर्णी यांनी भुमिका साकारल्या आहेत.
लग्नाच्या वयाच्या बरेच पुढे गेलेल्या दोघांचा ‘परफेक्ट मिसपॅच’ ते ‘परफेक्ट पार्टनर’, असा प्रवास या नाटकात आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी नोव्हेंबर ते डिसेंबरदरम्यान राज्यातील २४ केंद्रांवर झाली. यातील उत्कृष्ट ठरलेल्या २१ नाटकांचे सादरीकरण अंतिम फेरीत होणार आहे. त्यात मराठवाड्यातील लातूरचे ‘परफेक्ट मिसपॅच’बरोबरच नांदेड येथील तन्मय ग्रुपचे ‘वसुधैव कुटूंबकम्’ व परभणीच्या राजीव गांधी फोरमचे ‘गंमत असते नात्याची’ या नाटकांचा समावेश आहे.