लातूर : प्रतिनिधी
लातूरच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावून जाणारी बातमी समोर आली आहे. लातूर काँग्रेसचे नेते, माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांचे खंबीर अत्यंत विश्वासू सहकारी अॅड. मोईजभाई शेख यांचे आज २२ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता उपचारादरम्यान पुणे येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते.
त्यांच्या या अचानक जाण्याने संपूर्ण लातूर शहरावर आणि काँग्रेस पक्षावर शोककळा पसरली असून, लातूरने एक निष्ठावान, लढवय्या आणि उत्कृष्ट व्यक्तिमत्व गमावले आहे.
राजकीय वर्तुळात मोईजभाई शेख यांची ओळख माजी मंत्री अमित देशमुखांचे ‘निष्ठावंत शिलेदार’ म्हणून होती. अॅड. मोईजभाई शेख यांच्या निधनाने केवळ काँग्रेस पक्षाचेच नव्हे, तर लातूर शहरातील सर्वसामान्य जनतेचे वैयक्तिक नुकसान झाले आहे. एक सुसंस्कृत, मनमिळाऊ आणि कायदेतज्ज्ञ म्हणून त्यांचा मोठा जनसंपर्क होता.
अॅड.. मोईजभाई शेख यांनी आपल्या राजकीय जीवनात निष्ठेचे एक अनोखे आणि आदर्श उदाहरण घालून दिले होते. गेल्या काही काळापासून त्यांची प्रकृती खालावलेली होती आणि डॉक्टरांनी त्यांना सक्तीच्या आरामाचा सल्ला दिला होता.
त्यांच्या निधनाची बातमी वा-यासारखी पसरताच लातूरच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्यांच्या या अचानक एक्झिटने लातूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मोईजभाई शेख यांच्या पार्थिवावर मंगळवारीच रात्री ९.३० वाजता येथील हमालगल्लीतील कब्रस्तानात दफनविधी करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, चार भाऊ, असा परिवार आहे.
















