लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातील नेहमी ग्राहकांची मोठी वर्दळ असणा-या कापड गल्लीच्या कोप-यावरील धोकादायक इमारतीच्या वरच्या मजल्याचा काही भाग मंगळवार दि. २० मे रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास अचानक आलेल्या जोरदार पावसात कोसळला. इमारतीचा धोकादायक भाग कोसळून एका दुचाकीचे पूर्णपणे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही मनुष्यहानी न झाल्याने मोठा अनर्थ टळला.
शहरातील चैनसुख रस्त्याकडून मुख्य कापड गल्लीमध्ये प्रवेश केल्यानंतर उजव्या कोप-यावर अनिरुद्ध मदने यांचे मदने फॅशन हे कपड्याचे दुकान आहे. त्यांच्या दुकानालगतच राजकुमार हरियाणी यांचे साजन सरिता नावाचे कपड्याचेच दुकान आहे. मदने यांच्या दुकानाच्या वरच्या जागेची मालकी हरियाणी यांची आहे. या इमारतीचे बांधकाम किमान ५० वर्षे जुने असून ते मोडकळीस आले होते. या इमारतीच्या चारही बाजूच्या भिंतींना भेगा पडल्याचेही स्पष्ट दिसून येते. कापड गल्ली हा शहरातील अतिशय वर्दळीचा भाग असल्याने या भागातील अशा धोकादायक इमारतींमुळे नागरिकांच्या जीवालाही धोका उदभवू शकतो.
या इमारतीच्या वरच्या भागातील काही बांधकाम अनधिकृत असल्याचीही बाजारपेठेत चर्चा आहे. पावसाळ्यात धोकादायक इमारतींचा धोका अधिक वाढला आहे. या धोकादायक इमारतीच्या मालकांना लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने आज नोटीस बजावणार आहेत. हे बांधकाम पूर्णत: जुने असल्याने त्याचे तात्काळ नूतनीकरण होणे गरजेचे आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास इमारतीचा धोकादायक भाग कोसळल्याने अनिरुद्ध मदने यांच्या एमएच २४ ए के ५४०३ या दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महानगरपालिका प्रशासनाने लातूर शहरातील अशा जुन्या, धोकादायक इमारतींची पाहणी करून संबंधितांना तात्काळ नोटीस बजावून योग्य ती कार्यवाही करणे आवश्यक आहे. मंगळवारी या इमारतीचा भाग कोसळला तेव्हा सुदैवाने आजूबाजूला कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळल्याची चर्चा कापड गल्ली परिसरात केली जात आहे.