लातूर : प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूरकरांसाठी एक अभिनव संकल्पना समोर आणली आहे. लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी मतदारांनी क्यूआर कोड स्कॅन करुन आपल्या कल्पना, सूचना मतं आणि विचार मांडावेत असे आवाहन आमदार अमित देशमुख यांनी केले आहे.
धाराशिव जिल्ह्यातून वेगळं झाल्यानंतर लातूरने विकासात प्रचंड प्रगती केली. परंतु, महाविकास आघाडी सरकारचा मधला कालखंड सोडला तर मागील दहा वर्षांत लातूरच्या प्रगतीचा वेग कमी झाला. महायुती सरकारच्या दुर्लक्षामुळे लातूरची प्रगती खुंटली. हे चित्र जर बदलायचे असेल तर नव्या कल्पना आणायला पाहिजे. यासाठी लातूरच्या नव्या पिढीला, लोकांना सर्व समाजघटकांना माझे आवाहन आहे की, त्यांनी त्यांच्या सूचना आम्हाला क्यूआर कोडच्या माध्यमातून सांगाव्यात.
आम्ही त्याचा जाहीरनाम्यात समावेश करु. बाभळगाव येथे आयोजित दसरा मेळाव्यात सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख व मान्यवरांच्या हस्ते लातूर शहर विधानसभा मतदारसंघाच्या जाहीरनाम्यात नागरिकांच्या सूचनांचा समावेश होणा-या ‘क्यूआर कोड’ चे विमोचन करण्यात आले. लातूर शहरातील मतदार हा क्यूआर कोड स्कॅन करुन त्यांना वाटणारा महत्त्वाचा मुद्दा, प्रश्न, शहराच्या विकासासाठी आवश्यक असणारा दृष्टीकोन मांडू शकतात. मतदारांचे हे विचार थेट आमदार अमित देशमुख यांच्याकडे जाणार आहेत.