22.2 C
Latur
Thursday, January 30, 2025
Homeलातूरलातूरच्या विकासासाठी निधीचे समन्यायी वाटप व्हावे

लातूरच्या विकासासाठी निधीचे समन्यायी वाटप व्हावे

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नव्या उमेदीच्या छत्रपती शिवेंद्रसिंह अभयसिंहराजे भोसले यांना जबाबदारी मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. माजी मुख्यमंत्री विकासरत्न विलासराव देशमुख आणि माजी मंत्री छत्रपती अभयसिंह राजे भोसले यांचे अत्यंत स्नेहाचे, जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या सातारा येथील अजिंक्यतारा साखर कारखान्याची प्रेरणा घेऊनच लातूर येथे मांजरा शेतकरी साखर कारखान्याची उभारणी झाली आणि त्यातून या जिल्ह्याचा कायापालट झाला आहे. या आठवणींना उजाळा देऊन छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले लातूर जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेत पक्षाभिनवेश बाजूला ठेवून सकारात्मकतेने निर्णय घेतील, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. अत्यंत गतीने प्रगतीच्या वाटेवर मार्गक्रमण करीत असलेल्या लातूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने कोणताही भेदभाव न करता समन्यायी पद्धतीने निधीचे वाटप करण्यासाठी नूतन पालकमंत्री पुढाकार घेतील, असा विश्वासही माजी मंत्री आ. अमित देशमुख त्यांनी व्यक्त केला.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात दि. ३० जानेवारी रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा लातूरचे पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीची बैठक झाली. त्या वेळी माजी मंत्री आमदार अमित देशमुख बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालय येथील संविधान उद्देशिका प्रतिकृतीचे  मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. या वेळी दूरदर्शन प्रणालीद्वारे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, शिक्षक आमदार विक्रम काळे, माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, माजी मंत्री आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पालक सचिव मनीषा म्हैसकर, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे,  लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य  कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे आदींसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
शेती उत्पादनवाढीच्या दृष्टीने वीजपुरवठा नियमित राहील याची दक्षता घ्यावी, उद्योजकानाही वीजपुरवठा सुलभ पद्धतीने मिळण्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत त्यात लक्ष घालावे. सिकंदरपूर व एमआयडीसीतील वीज उपकेंद्र उभारणीला प्राधान्य द्यावे. लातूर जिल्ह्यातील शेतकरी प्रयोगशील असल्यामुळे येथे फुले, फळे आणि भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे, ही बाब लक्षात घेऊन यासाठीच्या स्वतंत्र बाजारपेठ निर्मितीसाठी शहराच्या जवळपास जागा उपलब्ध करून द्यावी. त्याच बरोबर दयानंद गेटसमोरील आणि गंज गोलाई भागातील भाजीपाला,  फळे विक्रेत्यांसाठी त्वरित पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी आदी मागण्या  या बैठकीदरम्यान माजी मंत्री आमदार  अमित विलासराव देशमुख यांनी  केल्या.  लातूर शहर व जिल्ह्यातील मूलभूत सोयी, सुविधा आणि विकास प्रकल्पांच्या संदर्भानेही काही निवेदनेही पालकमंत्री महोदयांकडे या वेळी सादर केली आहेत. पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी माडलेल्या सर्व विषयांना सकारात्मक प्रतिसाद दिला. आपण सर्व लोकप्रतिनिधी मिळून काम करूया, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR