लातूर : प्रतिनिधी
लातूर महानगरपालिकेची निवडणुक लागताच निलंगा, औसा, उदगीर, लातूर ग्रामीण, अहमदपूर, बारामती, नागपूर, ठाणे, मुंबई येथून कोणीतरी येतं आणि लातूरच्या बाबतीत बोलून जातं. ते येथे येतात ते फक्त लातूरचे लचके तोडण्यासाठी. लातूरकरांशी त्यांना काहींही देणं-घेणं नाही. लातूर हे लातूरकरांचं आहे. लातूरचा विकास करण्यासाठी लातूरकर समर्थ आहेत. कोणी येथे येऊन सांगण्याची, लुडबुड करण्याची गरज नाही, अशा शब्दात माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सत्ताधा-यांना खडे बोल सूनावले. त्यावेळी उपस्थित हजारो लातूरकर मतदार बंधु-भगिणींनी काँग्रेस, वंचित बहूजन आघाडीचा जयघोष करीत काँग्रेस-वंचितच्या विजयावर मोहर लावली.
लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीतील काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीचे प्रभाग क्रमांक १२ मधील उमेदवार जयश्री सोनकांबळे, धोंडीराम यादव, फिरदौस शेख, सतिश साळूंके, प्रभाग क्रमांक १३ मधील उमेदवार अमोल लांडगे, शाहीन मणियार, कमल सोमवंशी आणि बालासाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ दि. १२ जानेवारी रोजी सायंकाळी शहरातील संविधान चौकात आयोजित विराट सभेत माजी मंत्री, आमदार अमित देशमुख बोलत होते. यावेळी खासदार डॉ. शिवाजी काळगे, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, वंचित बहूजन आघाडीचे प्रदेश सचिव मुफ्ती वसीम सय्यद, वंचितचे मराठवाडा सचिव अॅड. संतोष सूर्यवंशी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळूंके, रमेश बियाणी, प्राचार्य डॉ. माधव गादेकर, प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर, सूर्यकांत कातळे, राम कोंबडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस-वंचित आघाडीच्या उमेदवाराना मिळणारा मतदार बंधु-भगिणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता सर्वच विरोधकाचे धाबे दणाणले आहेत. बाभळगाव येथून प्रभाग १२ व १३ च्या सभास्थळी येईपर्यंत विरोधकांच्या सभा, बैठका रस्त्यातली सर्व सभेतील मतदाराची एकूण उपस्थिती आणि या संविधान चौक येथील एकाच सभेतील विराट काँग्रेस-वंचित आघाडीच्या विजयावर शिक्का मोर्तब करणारी आहे, असे नमुद करुन माजी मंत्री, आमदार अमित देशमुख पुढे म्हणाले, काँग्रेस व वंचित बहुजन अघाडीने नुकताच आपला लातुरकरांच्या सूचना मागवून लातुरकरांचा जाहीरनामा तयार केला आहे
यात आपल्याला पाच गॅरंटी दिल्या आमच्याकडून देण्यात आल्या आहेत. आपल्या या जाहीरनाम्यात परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे ८० फुटी पुतळा व प्रेरणा सृष्टी, आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर व आदरणीय डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची स्मारके, लातुरमध्ये भव्यदिव्य अशी शिवसृष्टी, फेरीवालासाठी नवे धोरण, प्रत्येक चौकाचे सुशोभीकरण, नागरिकांना लागणा-या सर्व मूलभूत व्यवस्था, अल्पसंख्याक कल्याण केंद्र, भटके विमुक्त कल्याण केंद्र, लातूरच्या मनपा शाळेत सीबीएससी शिक्षण, प्रत्येक प्रभागात अभ्यासिका, ओपन जिम, उद्यान यासह अनेक योजना येणा-या काळात आम्ही आपल्यासाठी घेऊन येणार आहोत असे, असताना प्रचारासाठी आलेले भाजपचे नेते लातूरमधून आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या आठवणी पुसून टाकायची भाषा बोलतात त्यांना मी सल्ला देईन की, त्यांनी विकासावर बोलावे, मुद्यांवर बोलावे, पण ते बोलू शकत नाहीत.
पुढे बोलताना आमदार अमित देशमुख म्हणाले की, या आपल्या प्रभागात खाजगी सावकार निवडणूक लढवत असल्याचे कळले. ते सावकारी करणार की मग प्रभागातील नागरीकांच्या समस्या सोडवणार, प्रभागाचा विकास कसा करणार याचा विचार आपण करावा. सद्या खाजगी सावकारी मोठ्या प्रमाणावर वाढली असून अव्वाच्या सव्वा व्याजाने गरजूंना पैसे देऊन त्याच्या वसुलीसाठी वाटेल त्या थराला जायचे व सामान्य माणसाचे शोषण करायचे यात आपल्याला बदल घडवून आणायचा आहे,मनपातील भ्रष्टाचार संपवायचा आह. जन्म मृत्यू प्रमाणपत्र काढण्यासाठी पैसे घेतले जातात, घर बांधकामासाठी सामान्यांना दलाला शिवाय परवाना मिळत नाही हे चित्र लातूरमध्ये दिसते आहे आणि हे चित्र अतिशय विदारक असून आम्हाला हा भ्रष्ट कारभार स्वच्छ करून लोकाभिमुख शासन साकार करायचे आहे.
या निवडणुकीत प्रभागातील अनेकजण इच्छुक होते परंतु आमची इच्छा असूनदेखील आम्हाला काहींना उमेदवारी देता आली नाही तरीही आमच्या या पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यानी नाराज न होता राष्ट्रीय काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहावे असे ते म्हणाले. लातुरला उजनीच्या पाणी नाही आणून दिले तर पदाचा राजीनामा देईन, असे जाहीर भाषणात निलंग्याचे आमदार संभाजी पाटील म्हणाले याची आठवण करून देत त्यांचा मागील निवडणूक प्रचारातील व्हिडीओ सर्वाना ऐकवत याबाबत आपण सर्व मतदारांनी यांना या निवडणुकीत मत मागण्यासाठी आपल्या समोर आल्यास जाब विचारला पाहिजे, असे म्हणता स्वत:च्या फायद्यासाठी रात्रीतुन काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष व भाजपमध्ये प्रवेश करणा-यांच्या भुलथापाणा आपण बळी न पडता सर्वसामान्य कुटुंबातील तुमच्या हक्काची माणसे आपल्या काँग्रेस व वंचित बहुजन अघाडीकडून लातुर महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून दिलेली असून या सर्व उमेदवाराना आपण प्रचंड मतांनी निवडून देऊन आपल्या प्रभागाच्या विकासासाठी मनपात पाठवावे, असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित सर्वाना केले. यावेळी खासदार डॉ. शिवाजी काळगे, मुफ्ती वसीम सय्यद, श्रावण रॅपनवार, अॅड. संतोष सूर्यवंशी, अमोल लांडगे, यांची भाषणे झाली.
प्रास्ताविक उमेदवार धोंडीराम यादव यांनी यांनी केले. यावेळी रेगुडेअप्पा, माधव रासूरे, संजय ओव्हळ, प्रा. प्रविण कांबळे, आयुब मणियार, दत्ता सोमवंशी, अॅड. बाबासाहेब गायकवाड, रोहित दयाळ, राजेसाहेब सवई, प्रवीण सूर्यवंशी, परमेश्वर वाघमारे, सचिन गंगावने, निलेश देशमुख, सचिन पाटील, बशीर शेख यांच्यासह काँगेस व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते प्रभागातील मतदार बंधु, भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

