लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील लामजना महामार्गावर शनिवारी मध्यरात्री घडलेल्या भीषण अपघाताने रस्त्यावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. करजगाव पाटीजवळ एका भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने सरवडी गावातील ३ तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर तिस-या तरुणाने रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. कार चालकाने अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढल्याने पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. या घटनेने संपूर्ण निलंगा तालुक्यात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सरवडी गावातील तीन तरुण सचिन कांबळे (वय २२), राहुल जाधव (वय २४) आणि विशाल पाटील (वय २३) हे लातूर शहरातील एका कार्यक्रमातून रात्री ११:३० च्या सुमारास दुचाकीवरून आपल्या गावाकडे परतत होते.
रात्रीच्या वेळी लामजना महामार्गावर वाहनांचा वेग जास्त असल्याने अपघाताचा धोका वाढतो. करजगाव पाटीजवळ विरुद्ध दिशेने येणा-या एका कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीचे पूर्णपणे नुकसान झाले, आणि तिन्ही तरुण रस्त्यावर फेकले गेले.
अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी तरुणांना जवळच्या निलंगा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी सचिन कांबळे आणि राहुल जाधव यांना मृत घोषित केलं, तर विशाल पाटील याने उपचारादरम्यान काही तासांनी प्राण सोडले. या घटनेने सरवडी गावात शोककळा पसरली असून, मृत तरुणांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत लातूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत.