लातूर : प्रतिनिधी
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या १३८ व्या स्थापना दिनानिमित्त नागपूर येथे दि. २८ डिसेंबर रोजी काँग्रेस पक्षाचे महासंमेलन आयोजित करण्यात आले आहे. या महासंमेलनास लातूर जिल्ह्यातून हजारो काँग्रेसचे कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती कांग्रेसचे प्रदेश समन्वयक रामहरी रुपनवर यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
काँग्रेस भवन येथे झालेल्या या पत्रकार परिषदेस काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हाध्यक्ष अॅड. किरण जाधव, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभय साळूंके, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष अॅड. बाबासाहेब गायकवाड, अनुसूचित जाती विभागाचे लातूर शहराध्यक्ष प्रा. प्रविण कांबळे, लातूर तालुका काँग्रेसचे अध्य्क्ष सुभाष घोडके, प्राचार्य एकनाथ पाटील, सोशल मिडीया प्रमुख प्रविण सूर्यवंशी, अॅड. देविदास बोरुळे-पाटील यांची उपस्थिती होती.
काँग्रेसच्या महासंमेलनास अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी, काँग्रेसचे नेते खासदार राहूल गांधी, काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी व देशाभरातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार
आहेत, असे नमुद करुन रामहरी रुपनवर म्हणाले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाजी पटोले यांच्या निर्देशानूसार या महासंमेलनाच्या नियोजनासाठी राज्यातील नेत्यांना जिल्हानिहाय जबाबदारी देण्यात आली आहे. या महासंमेलनात लातूर जिल्ह्यातील हजारो काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, असेही ते म्हणाले.