मंगरुळमधील दोन चुलत भावाचा समावेश
उमरगा : प्रतिनिधी
उमरगा-लातूर महामार्गावर सोमवारी सायंकाळी पीकअप आणि दुचाकीची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास माडज पाटीजवळ ही भीषण दुर्घटना घडली. मृतांमध्ये औसा तालुक्यातील मंगरुळच्या दोन चुलत भावांचा समावेश आहे. त्यामुळे रामपुरे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
औसा तालुक्यातील मंगरुळ येथील दीपक वसंत रामपुरे (२७) आणि आकाश सूर्यकांत रामपुरे (२५) हे दोघे चुलत बंधू आपल्या कामानिमित्त सोमवारी उमरगा येथे गेले होते. तेथून दुचाकीवरून (क्र. एमएच ५ एएन ०५५४) गावाकडे येत असताना माडज पाटीजवळ ट्रकने पिकअपला (एमएच २५, पी. ३४०८) धडक दिल्याने पिकअप दुचाकीवर जाऊन धडकली. या अपघातात दीपक रामपुरे आणि आकाश रामपुरे या चुलत भावांसह पिकअपमध्ये चालकाच्या बाजूला बसलेल्या येळी (ता. उमरगा) येथील दिगंबर गिरजप्पा कांबळे (५७) या शेतक-याचा जागीच मृत्यू झाला तर पिकअप चालक संतोष स्वामी आणि मारुती रेड्डी (रा. येळी) हे जखमी झाले आहेत.
अपघातानंतर हे सर्वजण विव्हळत पडले होते. परंतु एकही वाहन थांबत नव्हते. त्यानंतर वैजनाथ काळे यांनी पळसगाव (ता. उमरगा) येथील जीप थांबवून अपघातग्रस्तांना तातडीने उमरगा येथील खाजगी रुग्णालयात हलविले. परंतु तिघांनाही मृत घोषित करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती.