लातूर : प्रतिनिधी
नवीन राष्ट्रीय महामार्ग घोषित झालेला लातूर-जहीराबाद रस्ता आज अक्षरश: मृत्यूचा रस्ता बनला आहे. रस्त्यावर जागोजागी पडलेल्या मोठमोठ्या व खोल भेगांमुळे या रस्त्याने प्रवास करणं म्हणजे दुचाकीस्वारांसाठी जीवावर बेतणारा जुगार झाला आहे. लातूर-जहीराबाद राष्ट्रीय महामार्ग हा रस्ता आहे की, मृत्यूचा सापळा?, असा प्रश्न नागरीकांना पडला आहे.
लातूर-जहीराबाद राष्ट्रीय महामार्गाची तात्काळ रस्त्याची पाहणी करुन सर्व भेगा व खड्डे बुजवाव्यात, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना चेतावणी फलक व अपघातसूचक चिन्हे लावावीत. रात्रीच्या वेळी दृश्यता वाढवण्यासाठी अपूर्ण भागात स्ट्रीट लाइट्स लावावेत. दुचाकी व हलक्या वाहनांसाठी तात्पुरता सुरक्षित मार्ग निर्माण करावा. या रस्त्यावर घडलेल्या अपघातांची अधिकृत आकडेवारी जाहीर करावी. मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना तात्काळ नुकसानभरपाई व सरकारी मदत द्यावी. जखमी झालेल्यांच्या वैद्यकीय खर्चाची जबाबदारी शासनाने घ्यावी. या रस्त्याचे काम देण्यात आलेल्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करुन, काळ्या यादीत टाकावे.
कामाच्या गुणवत्तेची उच्चस्तरीय चौकशी करून अहवाल जनतेसमोर सादर करावा. भविष्यातील अपघात टाळण्यासाठी या मार्गाची दीर्घकालीन सुधारणा योजना त्वरित जाहीर करावी. रस्त्यावर अपघातग्रस्त ठिकाणी तात्काळ ‘अॅबुलन्स पॉइंट’ आणि ‘एमर्जन्सी हेल्प बुथ’ सुरु करावेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष भेटी देऊन अहवाल तयार करतील, याची शाश्वती द्यावी. प्रत्येक गावाच्या जवळ, शाळा-महाविद्यालयाच्या ठिकाणी व बाजारपेठेच्या परिसरात ठळक व योग्य त्या अंतरावर गतिरोधक तयार करावेत, जेणेकरुन वाहनांची गती नियंत्रित राहील आणि अपघात टाळता येतील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व जिल्ह्याचे पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी याची त्वरित दखल घ्यावी, अन्यथा रस्ता रोकोसारख्या तीव्र आंदोलनाचा मार्ग जनतेला घ्यावा लागेल, असा इशारा एनएसयुआयचे लातूर जिल्हाध्यक्ष रामराजे काळे यांनी दिला आहे.