लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने स्थापनेपासून नेहमीच शेतकरी सभासदांना वेळेवर कर्ज देऊन आधार देण्याचे काम केले आहे. सध्या कार्यरत संचालक मंडळाने तीच परंपरा कायम ठेवत बँकेचे मार्गदर्शक सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या मार्गदर्शनात बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांनी शेतकरी हिताच्या अनेक योजना आखून त्यास मूर्त स्वरुप दिले आहे. बँकेकडून अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत पात्र लाभार्थ्यांना कर्ज वितरण करण्यात आले.
या योजनांचा मोठ्या प्रमाणात लातूर जिल्ह्यातील शेतक-यांना लाभ होत आहे. कार्यरत संचालक मंडळाच्या प्रगतशील वाटचालीत बँकेतील शेती कर्ज विभागामार्फत विविध प्रकारच्या मध्यम मुदती कर्ज योजनेअंतर्गत मागील साडेतीन वर्षात एकूण ७११ शेतकरी सभासदांना रक्कम रुपये १३७ कोटी कर्ज वितरीत करण्यात आले आहे.
शेतकरी हिताचा विचार करत असताना जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख व संचालक मंडळाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून गरजू व पात्र शेतक-यांना मिळत असलेल्या व्याज सवलतीचा लाभ मिळावा याकरिता लातूर ग्रामीणमधील गुंफावाडी येथील शेतकरी सभासद रामानंद वैजनाथ जाधव यांना ट्रॅक्टर व ट्रेलरसाठीचे कर्ज रुपये सतरा लाखाचा धनादेश बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.
यावेळी बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, संचालक पृथ्वीराज शिरसाठ, एन. आर. पाटील, जयेश माने, राजकुमार पाटील, अनुप शेळके, संत शिरोमणी कारखाना चेअरमन श्याम भोसले, गणेश ढगे, कार्यकारी संचालक एच जे. जाधव, शेती विभागाचे प्रमुख राजेश मुळे आदींची उपस्थिती होती.