22 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeलातूरलातूर जिल्हा रुग्णालयाच्या उभारणीला गती

लातूर जिल्हा रुग्णालयाच्या उभारणीला गती

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा रुग्णालयाची उभारणी, त्यासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी निधीची तरतूद करणे, यासह लातूर शहर व जिल्ह्यातील आरोग्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठीच्या  मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांना राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी मुंबई येथे भेट घेऊन दिले. लातूर जिल्ह्यातील विविध आरोग्य संबंधित समस्या आणि त्यांच्या निराकरणासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. या मागण्याबाबत त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आता लातूर जिल्हा रुग्णालयाच्या उभारणीला गती मिळलणार आहे.
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांची द. १४ जानेवारी रोजी  मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत उभयतामध्ये लातूर जिल्हा रुग्णालयाची उभारणीसाठी आवश्यक असलेल्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी निधीची तरतूद करणे, यासह लातूर शहर व जिल्ह्यातील आरोग्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी चर्चा झाली.
खाजगी रुग्णालयांच्या मागण्यांचाही विचार
लातूर शहर आरोग्य सेवेचे केंद्र म्हणून पुढे येत आहे. या परिस्थितीत या शहरातील खाजगी रुग्णालयांच्या वतीने इंडियन मेडिकल असोसिएशनने काही मागण्या शासनाकडे सादर केल्या आहेत. त्यास मंजुरी द्यावी, अशी विनंतीही याप्रसंगी त्यांच्याकडे केली. खाजगी रुग्णालय परवान्याचे नूतनीकरण दर ३ वर्षाऐवजी ते दर ५ वर्षांनी करावे, खाजगी हॉस्पिटल मधील मनुष्यबळ नियुक्तीच्या नियमात काही अंशी शिथिलता आणावी यासह आयएमएने केलेल्या इतर काही मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत त्यावर विचार करून त्वरित निर्णय
घेण्यात यावा, अशी विनंती याप्रसंगी केली.
आरोग्यमंर्त्यांसोबतची ही भेट  सकारात्मक
एकंदरीत सार्वजनिक आरोग्यमंर्त्यांसोबतची ही भेट  सकारात्मक वातावरणात पार पडली. यावेळी त्यांच्याकडे सादर केलेल्या सर्व मागण्या सार्वजनिक हिताच्या आहेत त्यामुळे त्यावर त्वरित अनुकूल निर्णय घेण्यात येईल, लातूर जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम लवकरात लवकर सुरु होईल या दृष्टीने प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांना दिली. या भेटीमुळे लातूर जिल्ह्यातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळण्याची अपेक्षा वाढली आहे. लवकरच लातूर जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम सुरू होईल आणि जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा दर्जा उंचावेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR