लातूर : प्रतिनिधी
गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या लातूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या उभारणीचा प्रश्न पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नामुळे मार्गी लागला आहे. या रुग्णालयासाठी आवश्यक जागेच्या मोबदल्यासाठी ३ कोटी ३२ लाख रुपयांच्या निधीला पुरवणी मागण्यांमध्ये मंजुरी देण्यात आली होती. हा निधी बीडीएस प्रणालीवर वितरीत करण्याबाबतचा शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने शुक्रवारी निर्गमित केला आहे.
सन २०१३ मध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय उभारण्यास मान्यता देण्यात आली होती. १०० खाटांचे हे रुग्णालय उभारण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातून ३१ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी ही प्राप्त झाला आहे. या रुग्णालयासाठी कृषी महाविद्यालयाची १० एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. या जागेचा मोबदला म्हणून परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला ३ कोटी ३२ लाख ६८ हजार ६५० रुपये देण्यास मान्यता देण्यात आली होती. मात्र, निधी अभावी ही कार्यवाही प्रलंबित होती.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लातूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिल्याच दौ-यात त्यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करुन त्यांनी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जिल्हा रुग्णालयाच्या जागेसाठी आवश्यक निधी पुरवणी मागण्यांमध्ये मंजूर करुन घेतला होता.
हा निधी आरोग्य विभागाकडे प्राप्त झाला आहे. तसेच परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला हा निधी वितरीत करण्याबाबतचा शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने शुक्रवारी निर्गमित केला आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही पूर्ण करुन परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला हा निधी देण्यात येणार आहे.