लातूर : प्रतिनिधी
राज्यातील जिल्हा बँकात नावलौकिक असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्जमाफी संदर्भातील संभ्रम व प्रतिकूल परिस्थिती असतानाही राज्याचे माजी मंत्री तथा सहकार महर्षी जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वसुलीचे सातत्य कायम ठेवत मार्च-२०२५ अखेर बँकपातळीवर शेती कर्जाची ८९.०५ टक्के वसुली करून आदर्श निर्माण केलेला आहे.
गेल्या अनेक वर्षापासून पारदर्शक कारभार ठेवूण शेतकरी सभासदांचे हित जोपासून वसुलीत सातत्य कायम ठेवण्यात यश मिळवले आहे अशी माहिती लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख यांनी दिली. राज्यातील नामांकित बँकात लातूर जिल्हा बँक वसुलीत आघाडीवर सन २०२४-२५ विद्यमान वसुली हंगामात बँकेची १७०६ कोटी रक्कम वसूल होणे आवश्यक होते. त्यापैकी मार्च २५ अखेर बँकेने १५१९ कोटी वसुली केलेली असुन बँकेची वसुलीची टक्केवारी ८९.०५ टक्के आहे. महाराष्ट्रातील पुणे, सातारा,सांगली,कोल्हापूर,अकोला,संभाजीनगर अशा इतर नामांकित जिल्हा बँकेच्या तुलनेत लातूर जिल्हा बँकेच्या वसुलीचे प्रमाण अधिक असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यामध्ये ९८.६३ टक्के वसुली करून रेणापूर तालुक्याने पहिला, ९४.६७ टक्के वसुली करून लातूर तालुक्याने दुसरा तर ९०.०२ टक्के वसुली करून देवणी तालुक्याने तिसरा क्रमांक पटकवला आहे. इतर सर्व तालुक्याची वसुलीची टक्केवारी ८० टक्केपेक्षा अधिक आहे. जिल्हा बँकेमार्फत पतपुरवठा असलेल्या ५८४ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी पैकी २१८ सोसायट्यांनी बँक स्तरावर १०० टक्के वसुली देऊन बँकेस मोलाचे सहकार्य केलेले आहे. तसेच शेतीकर्ज व्यवहार असलेल्या बँकेच्या ११० शाखांपैकी १४ शेतीकर्ज शाखाही बँक स्तरावर १०० टक्के वसूल झालेल्या
आहेत.
लातूर जिल्हा बँकेकडून वसुलीबाबत समाधान व्यक्त करून बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख, उपाध्यक्ष
अँड. प्रमोद जाधव व बँकेच्या सर्व संचालक मंडळाने समाधान व्यक्त करून विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सर्व पदाधिकारी,गटसचिव व बँकेचे कार्यकारी संचालक, सर्व विभाग प्रमुख, फिल्ड ऑफिसर, शाखा तपासणीस, शाखा व्यवस्थापक व सर्व कर्मचारी यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.