लातूर : एजाज शेख
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांसोबतच खाजगी अनुदानीत शाळांतील शिक्षकांची पदे भरली जात नाहीत. त्यातच अतिरिक्त शिक्षकांची संख्या खुप मोठी आहे. गेल्या १० वर्षांपासून शिक्षकांची भरती झालेली नाही. परिणामी भावी शिक्षकांनी पर्यायी रोजगार स्वीकारला आहे. ही परिस्थिती लक्षात घेता शेकडो युवक-युवतींनी शिक्षक होण्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे प्रवेशाअभावी लातूर जिल्ह्यातील १४ खाजगी तर १ शासकीय ‘डीएड’ महाविद्यालये बंद झाली आहेत तर चार खाजगीसह उदगीरचे एक शासकीय ‘डीएड’ महाविद्यालय कार्यरत असल्याची वस्तूस्थिती समोर आली आहे.
शिक्षणाची पंढरी, अशी ओळख निर्माण झालेल्या लातूर जिल्ह्यात शिक्षक घडविणा-या संस्थाही मोठ्या प्रमाणात होत्या. लातूर शहरात ५, औसा-१, निलंगा-२, रेणापूर-२, शिरुर ताजबंद-१, अहमदपूर-३, जळकोट-२ तर उदगीर येथे २ असे एकुण १८ खाजगी ‘डीएड’ महाविद्यालये तर मुरुड व उदगीर येथे प्रत्येकी एक असे दोन शासकीय ‘डीएड’ महाविद्यालये होती. जिल्ह्यात १८ खाजगी तर २ शासकीय असे एकुण २० ‘डीएड’ महाविद्यालये होती. त्यापैकी १४ खाजगी व मुरुडचे एक शासकीय, असे एकुण १५ ‘डीएड’ महाविद्यालये बंद पडली आहेत. चार खाजगी व उदगीरचे एक शासकीय असे ५ ‘डीएड’ महाविद्यालये सध्या कार्यरत आहेत.
साधारणत: १५-१६ वर्षांपुर्वी ‘डीएड’कडे सर्वांचाच कल होता. त्याकाळी ‘डीएड’ होताच शिक्षकाची नोकरी पटकण मिळत असे. परंतू काळ बदलत गेला आणि ‘डीएड’चे महत्वही कमी म्हणण्यापेक्षा आता संपलेच, असे दिसून येत आहे. अधी १० वी त्यानंतर १२ मध्ये ९०-९५ टक्के जरी गुण मिळाले तरीदेखील विद्यार्थी विशेषत: मुली ‘डीएड’साठी ईच्छूक असायच्या. त्यावेळी प्रवेशाची गुणवत्ता यादी ८५ टक्क्यांवरच असायची. २०१२-२०१३ नंतर राज्यात शिक्षकभरतीच झाली नसल्याने नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या अनेक युवक-युवतींचे वय निघून गेले. विनाअनुदानीत शाळांवर १२-१५ वर्षे बिनपगारी काम करणारे अनेकजण आज सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आले, तरीही त्यांना पगार सुरु झाला नाही. आता शिक्षकभरतीची घोषणा व सुरुवात होऊन सहा महिने लोटले, तरीदेखील प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. शिक्षण पुर्ण करुनही नोकरी मिळत नसल्याने भावी शिक्षकांनी पर्यायी शिक्षणाचा मार्ग अवलंबल्यानेच जिल्ह्यातील १५ ‘डीएड’ महाविद्यालयांना टाळे लागले आहेत.