लातूर : प्रतिनिधी
यंदाच्या पावसाळ्यात सतत पाऊस आहे. गेल्या १०-१२ दिवसांत तर पावसाने कहरच केला. संपुर्ण जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे नद्यांना व नाल्यांना पुर आला. परिणामी शेतजमिनी वाहून गेल्या. मोठ्या प्रमाणात पशु दगावले. ७० टक्क्यांपेक्षा अधिक पिके पुर्णपणे हातची गेली आहेत. शेकडो घरांची पडझड झाली. त्यामुळे लातूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीचे निवेदन लातूर जिल्हा काँग्रेस व लातूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने दि. ४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले, अशी माहिती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभय साळूंके व शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. अतिवृष्टीत जळकोट तालुक्यातील एक व्यक्ती वाहून गेला. त्या व्यक्तीच्या परिवारास १० लाख रुपये मदत द्यावी, जिल्ह्यातील नदी, नाल्याकाठी पुर्णपणे वाहून गेलेल्या जमिनी, पिकांचे नुकसानसोबच माती वाहून गेली.
सरकारने माती टाकुन द्यावी, उदगीर तालुक्यातील बोरगावचे तात्काळ पुनर्वसन करावे, नदी, नाल्याकाठच्या शेतक-यांना पीक नुकसानीसह जमिनी खरडणीची मदत म्हणून एकरी २ लाख रुपये द्यावेत, वाहून गेलेल्या घरांना खास बाब म्हणून तात्काळ नवीन घरकुल मंजूर करुन मदत करावी, कमी नुकसान झालेल्या घरांना पडझडीची मदत करावी, वाहून गेलेल्या पशुधनांसाठी प्रति पशु १ लाख रुपयांची मदत द्यावी, अति पावसाने गावोगावचे रस्ते, पुल वाहून गेले व उखडले आहेत. त्यामुळे तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, कोरडवाहू जमिनीला एकरी ५० हजार रुपये, बागायतदार एकरी १ लाख रुपये, फळ बागायतदारांना एकरी १.५ लाख रुपयांची मदत तात्काळ द्यावी,
लातूर जिल्ह्यातील सर्व शेतक-यांना सरसकट पीकविमा मंजूर करावा, लातूर जिल्ह्यातील नदी, नाल्याकाठच्या शेतक-यांचे विद्यूत मोटारी, ट्रॅक्टर, बैलगाड्या, शेती औजारे, पुराच्या पाण्यात वाहनू गेले आहेत. त्यांना भरीव आर्थिक मदत करावी, आदी मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे. या निवेदनावर काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमर खानापूरे, अजित निंबाळकर, अॅड. प्रमोद जाधव, सुभाष घोडके, दयानंद बिडवे, अॅड. बाबासाहेब गायकवाड यांच्या स्वाक्ष-या आहेत. या पत्रकार परिदेस सुभाष घोडके, मारुती पांडे, अॅड. शरद देशमुख, कैलास कांबळे, अप्पा मुंडे, प्रविण सूर्यवंशी, अॅड. देविदास बोरुळे यांची उपस्थिती होती.