लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात पावसाचा धडाका सुरूच असून, गुरुवारी मध्यरात्री विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे रस्ते तुडुंब भरून वाहात असून, अनेक ठिकाणी सखल भागांत रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले होते. पावसाचा जोर वाढल्याने गाव भागात अनेकांना रात्र जागून काढावी लागली.
मागच्या काही दिवसांपासून राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे बहुतांश महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. लातूर जिल्ह्यातही जवळपास सर्वच महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने खरीप पिकांची प्रचंड नासाडी झाली आहे. सातत्याने जोरदार पाऊस पडत असल्याने आधीच नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहात असून, पाझर तलावांसह सर्व प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यातच गुरुवारी मध्यरात्री पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाल्याने शेतक-यांसह नागरिक धास्तावले आहेत.