बार्शी रोडवर तिघे तर चाकूर तालुक्यात आई-मुलासह जावयाचा मृत्यू
लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात सोमवार अपघात वार ठरला. लातूर शहरातील लातूर-बार्शी रोडवर ट्रॅक्टर आणि ऑटोरिक्षाच्या धडकेत तीन जागीच ठार झाले. ही घटना दि. १९ मे रोजी दुपारी ४ वाजता घडली. तत्पूर्वी चाकूर तालुक्यातील घरणी येथे दुचाकीवरून जाणा-या तिघांना पाठीमागून येणा-या दुचाकीने धडक दिल्याने आई-मुलासह जावयाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
ट्रॅक्टर (क्र. एमएच २४ एजी २२४८) बार्शीकडून लातूर शहराकडे येत होता तर एमएच २४ एटी ८४६९ या क्रमांकाचा ऑटोरिक्षा लातूरहून १२ नंबर पाटीकडे जात होता. लातूर-बार्शी रोडवरील पुलाच्या खाली ट्रॅक्टर व ऑटोरिक्षाची जोरदार धडक झाली. यात तिघे जागीच ठार झाले. यामध्ये प्रतीक्षा संतोष पस्तापुरे (१० वर्षे रा. १२ नंबर पाटी), सुमन सुरेश धोत्रे (५८, रा. सावेवाडी लातूर व शिवाजी ज्ञानोबा कतलाकुटे (६२, रा. १२ नंबर पाटी) यांचा समावेश आहे. अपघातात ऑटोरिक्षाचा टप उडून गेला. अपघातस्थळी मोठी गर्दी झाली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दरम्यान एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी पोचून अपघातातील तिन्ही शव विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडे रवाना केले. अपघाताचा अधिक तपास एमआयडीसी पोलिस करीत आहेत.
दरम्यान, चाकूर तालुक्यात घरणी येथील पुलाजवळ दुपारच्या वेळी मुलगा, आई आणि जावई एका दुचाकीवरून जात असताना दुस-या एका दुचाकीने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात विठ्ठल शिंदे (३४), आई यशोदाबाई शिंदे (६५) आणि जावई लालासाहेब पवार (३८) यांचा मृत्यू झाला. घरणी येथील विठ्ठल शिंदे आई यशोदाबाई आणि जावई लालासाहेब पवार हे तिघे दुचाकी(एमएच २४, बीक्यू ६८३७) वरून जात होते. त्यावेळी लातूरहून चाकूरकडे येणा-या दुचाकीने (२६, बीएन ७०१२) पाठीमागून धडक दिली. या अपघातात समोरील दुचाकीवरील तिघे ठार झाले तर दुस-या दुचाकीवरील ज्ञानेश्वर पांचाळ जखमी झाले. त्यांच्यावर लातूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात पवार यांचा चाकूरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला तर आई यशोदाबाई आणि मुलगा विठ्ठल शिंदे लातूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.