लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरासह संपूर्ण जिल्हाभर अवकाळी पावसाने धुमाकुळ घातला आहे. सलग पाच दिवसांपासून जिल्ह्याला अवकाळी पाऊस झोडपून काढत आहे. विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटांसह जोरदार पाऊस पडत आहे. सोमवारी पहाटे २.१५ वाजण्याच्या सुमारास लातूर शहरात जोरदार पाऊस पडला. विजांच्या कडकडाटाने भितीचे वातावरण निर्माण झाले होते. हा पाऊस पहाटे ३ वाजेपर्यंत सुरु होता. दुपारी पावसाला पुन्हा सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरुच होता.
गेल्या पाच-सहा दिवसांपासून लातूर शहर व जिल्ह्यात पाऊस डेरे दाखल आहे. दिवसभर जाणवत असलेला उकाडा आणि सायंकाळी झालेल्या हलक्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. दरम्यान सोमवारी पहाटे २.१५ वाजता विजांच्या कडकडाटासह पावसाला प्रारंभ झाला. अवकाळी पाऊस मोठा असल्याने शहरात रस्त्यांवर सर्वत्र पाणीच पाणी वाहत होते. पाऊस सुरु असताना वीजपुरवठाही खंडित झाला. गेल्या आठवड्यातील हा सर्वात मोठा पाऊस असल्याचे दिसून आले.
लातूर शहरासह जिल्ह्यातील उदगीर, देवणी, औसा तालूक्यातही रविवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली.लातूरात सोमवारी पहाटे सुरु झालेला पाऊस सकाळी ६ वाजेपर्यंत होता. त्यानंतर पाऊस थांबला परंतु, दुपारनंतर पुन्हा सुरु झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरुच होता. शहरातील रस्त्यांने पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहत होते. गटारी तुडूंब भरुन गटारीतील कचरा, घाणपाणी रस्त्यावर आले होते. अनेक ठिकाणी लहान गटारी असल्यामुळे त्या तूंबल्याचे दिसून आले. शहराच्या गाव भागात या पावसाने दाणादाण उडवली. गावभागातील सर्वच लहान-लहान रस्ते, गल्ली बोळांतून पावसाच्या पाण्याचे लोंढे वाहत होते. त्यामुळे या भागातील सर्वच प्रकारची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. खडक हनुमान, तेलीगल्ली ते पटेल चौक हा सर्व भाग जलमय झाला होता.