लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हयात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविले जात आहे. या अभियानातंर्गत लातूर तालुक्यातील ११२ ग्रामपंचायतींच्या स्वतंत्र वेबसाईट तयार करण्यात आल्या आहेत. लातूर तालुक्यातील ग्रामपंचायतींचा कारभार वेबसाईटमुळे हायटेक होणार असून नागरीकांनाही घरबसल्या अनेक सेवा, सुविधा उपलब्ध होणार आहेत.
लातूर तालुक्यातील ग्रामपंचायतींचे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून बळकटीकरण होत आहे. शासनाच्या सर्व योजना लोकाभिमुख करण्यासाठी लातूर तालुक्यातील ११२ ग्रामपंचायतींच्या वेबसाईट तयार करण्यात आल्या आहेत. या वेबसाईटवर ग्रामपंचायतीची सात प्रकारची प्रमाणपत्र ऑनलाईन मिळणार आहेत. या वेबसाईटवर ग्रामपंचायत राबवत असलेले उपक्रम, विद्यामान सदस्यांची यादी, गावातील नाविण्यपूर्ण केलेली कामे, गावाची ओळख सांगणारी पर्याटन स्थळे, ग्रामसभेत घेतलेले महत्वाचे निर्णय आदी महत्वाच्या घडामोडीची माहिती ऑनलाईन पाहता येणार आहे. नागरीकांसाठी जे उपक्रम राबविले, त्याची माहितीही या वेबसाईटवर पाहयला मिळणार आहे. ग्रामपंचायतींच्या वेबसाईटवरून नागरीकांना जन्म, मृत्यूचा दाखला, विवाह नोंद दाखला, नमुना ८ चा उतारा, ग्रामपंचायत येणे बाकी, निराधार असल्याचा दाखला, दारिद्रय रेषेखालील असल्याचा दाखला ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध होणार आहे.