खासदारांच्या प्रयत्नांना यश, मराठवाडा जनता विकास परिषदेचाही पाठपुरावा
लातूर : प्रतिनिधी
सोलापूर, लातूर-धर्मावरम तिरुपती ही आठवड्यातून एकदा धावणारी रेल्वेगाडी गुरुवार, दि. २४ जुलैपासून पुन्हा प्रवाशांच्या सेवेत असणार आहे. सोलापूरकरांपासून लातूरकरांसाठी ही रेल्वे खूप महत्त्वाची आहे. परंतु मध्येच ती बंद करण्यात आली होती. यासाठी लातूरचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी रेल्वे मंत्रालयाला पत्र पाठवून प्रयत्न केले. तसेच मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव नरहरे यांनीही पाठपुरावा केला. अखेर या पाठपुराव्याला यश आले आहे.
सोलापूर-लातूर तिरुपती (धर्मावरम) ही रेल्वे गाडी लातूरहून तिरुपतीला जाण्यासाठी सर्वांसाठी सोयीची आहे. आठवड्यातून एकदा धावणारी ही रेल्वे मध्येच बंद करण्यात आली. त्यामुळे लातूर, धाराशिवहून तिरुपतीला जाणा-या प्रवाशांची गैरसोय होऊ लागली. ही रेल्वेगाडी ८ दिवसांत सुरू करावी अन्यथा रेल रोको करण्याचा इशारा मराठवाडा रेल्वे संघर्ष समिती आणि मराठवाडा जनता विकास परिषदेने केला होता. यासाठी ५० पेक्षा जास्त संघटनांनी पाठिंबा दिला होता. दरम्यान, यासंबंधी लातूरचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी रेल्वे मंत्रालयाला पत्र दिले होते. तसेच मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांना पत्र देऊन तातडीने रेल्वे सुरू करण्यासंबंधी पाठपुरावा केला. रेल रोकोचा इशारा आणि दोन्ही खासदारांनी केलेला पाठपुरावा यामुळे गुरुवार, दि. २४ जुलैपासून दर गुरुवारी लातूर, धाराशिवमार्गे सोलापूर ते तिरुपती (धर्मावरम) रेल्वेगाडी धावणार आहे.
तिरुपतीला जाणारी ही रेल्वे गुरुवारी रात्री १.४० वाजता बार्शीत २.३० वाजता धाराशिवमध्ये, पहाटे ४.२० वाजता लातूरमध्ये पोहोचेल आणि ४.२५ वाजता तिरुपतीसाठी रवाना होईल आणि परत येण्याची वेळ दुस-या दिवशी लातूर येथे सकाळी ६.३० वाजता, धाराशिव येथे ७.४० वाजता आणि बार्शीत ८.१८ वाजता पोहोचेल, असे मध्य रेल्वे विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
रेल्वे सुरू केल्याने आभार
लातूर, धाराशिवकरांच्या मागणीची दखल घेऊन तिरुपती रेल्वे पुन्हा सुरू केल्याने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, रेल्वेचे मुख्य रेल्वे परिचालन अधिकारी, सोलापूर मंडळ रेल्वे प्रबंधक यांची सकारात्मक भूमिका आणि लातूरचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलेला पाठपुरावा यामुळे तिरुपती रेल्वेसेवा सुरू होत आहे. त्याबद्दल रेल्वे प्रवाशांच्या वतीने मराठवाडा जनता विकास परिषद आणि मराठवाडा रेल्वे संघर्ष समिती लातूर यांनी आभार मानले.