लातूर : प्रतिनिधी
मृग नक्षत्र सुरू होताच आता पावसाने हजेरी लावायला सुरुवात केली असून, नांदेड, धाराशिवसह लातूर जिल्ह्यात पहिल्याच दिवशी पाऊस झाला. आज मान्सूनचा वेग मंदावल्याने चिंता वाढली होती. परंतु ब-याच भागांत चांगला पाऊस झाल्याने शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. परंतु अद्याप मान्सून दाखल झाला नसल्याने शेतक-यांनी पेरणीसाठी घाई करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
नांदेड जिल्ह्यात रविवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह नांदेडमध्ये पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे प्रचंड उकाड्यात पावसाने हजेरी लावल्याने नांदेडकर सुखावले. या पावसामुळे सखल भागांत पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. धाराशिवमध्येही शहरासह जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीच पावसाने दमदार हजेरी लावली. त्यानंतर रविवारीही काही भागांत पाऊस झाला. यासोबतच लातूर जिल्ह्यात रविवारी दिवसभर कडक ऊन आणि उकाडा पाहायला मिळाला. त्यानंतर रात्री लातूर शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. लातूर शहरात रात्री साडेदहाच्या सुमारास पाऊस झाला. औसा तालुक्यातही ब-याच भागांत वादळी वा-यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. जिल्ह्यात इतर ठिकाणीही पावसाने हजेरी लावली.
















