लातूर : प्रतिनिधी
गेल्या तब्बल १९ दिवसांपासून लातूर शहर व परिसरात बेमोसमी पावसाने धुमाकुळ घातला आहे. दि. २७ मे रोजी दुपारी २.१५ ते ४.३० या कालावधीत पडलेल्या मुसळधार पावसाने लातूर पाण्यात गेले. नाल्या तुंबल्या. पाण्याचा निचरा होत नसल्याने सर्वच रस्त्यांना तलावाचे स्वरुप आले होते. सखल भागात तर रस्तयावर गुडघाभर पाणी होते. या पावसाने शहरात सर्वत्र दाणादाण उडवून दिली.
लातूर जिल्ह्यात दि. ९ मे पासून पाऊस सुरु आहे. या बेमोसमी पावसाने संपूर्ण जिल्हा व्यापून टाकला आहे. नदी, नाले, ओढे तुडूंब भरून वाहत आहेत. मांजरा नदीवरील बराज पुर्ण क्षमतेने भरले आहेत. विजा पडून मनु्ष्य तसेच पशूंची जीवित हाणी झाली आहे. पिकांचे मोठे नूकसान झाले आहे. अनेक ठिकाणी छोटे पुल वाहून गेले आहेत. रस्ते बंद झाले आहेत. दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
मंगळवारच्या पावसाने अंबाजोगाई रोडवरील पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर तळे साचले. पाण्याचा निचरा न झाल्याने या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. जुना रेणापूर नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, दयानंद गेट, औसा रोड, महात्मा गांधी चौक, गंज गोलाई, छत्रपती राजर्षी शाहू महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, स्वामी विवेकानंद चौक, गरुड चौक या सर्वच रस्त्यांवर पाणीच पाणी होते. मेघ गर्जनेसह पडलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र धावपळ उडाली होती.