22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeलातूरलातूर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

लातूर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

लातूर : प्रतिनिधी
भारतीय राज्यघटनेला आदर्श मानून केंद्र व राज्य शासन जनतेच्या कल्याणासाठी विविध लोककल्याणकारी योजना राबवीत आहे. या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासह सर्व सर्व समाज घटकांना सोबत घेवून जिल्ह्याला विकासात अग्रेसर बनविण्यासाठी शासन आणि प्रशासन प्रयत्नशील असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी शुक्रवारी येथे सांगितले.
जिल्हा क्रीडा संकुल येथे ७५ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात उपस्थितांना शुभेच्छा देताना मंत्री बनसोडे बोलत होते. सर्वप्रथम मंत्री बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त्त बाबासाहेब मनोहरे, अपर जिल्हाधिकारी सुनील यादव यांच्यासह लोकप्रतिनिधी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
लातूर जिल्ह्यात शेती, आरोग्य, शिक्षण, उद्योग, पायाभूत सुविधा निर्मितीला प्राधान्य देण्यात येत आहे.  शेतीला संरक्षित सिंचनाची सोय व्हावी, यासाठी जलयुक्त्त शिवार अभियानाचा दुस-या टप्प्यात १२८ गावातील ३ हजार ६६० कामांसाठी १३५ कोटी ८५ लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.  यापैकी १६ कोटी ६९ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच डोंगरी तालुका अशी ओळख असलेल्या जळकोट तालुक्यात तिरू नदीवरील ७ कोल्हापुरी पद्धतीच्या बंधा-यांचे बॅरेजमध्ये रुपांतरण करण्यात आले आहे. यामुळे २.२४ दलघमी साठवण क्षमता तयार होणार आहे. त्याचा ४९६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फायदा होणार असल्याचे मंत्री बनसोडे यांनी सांगितले.
गतवर्षी खरीप हंगामात १ रुपया विमा हप्ता भरून शेतक-यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी घेतला. या योजनेतून जिल्ह्यात २ लाख ९१ हजार शेतक-यांना १९८ कोटी ७९ लाख रुपये भरपाई मिळाली. त्यामुळे शेतक-यांना आधार मिळाला. तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी  अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेतून जिल्ह्यातील ४३ विमा दावे मंजूर झाले असून आतापर्यंत ४२ लाख रुपये अनुदान देण्यात आल्याचे मंत्री बनसोडे म्हणाले. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून आतापर्यंत २३९ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. या उद्योगांसाठी २ कोटी ४३ लाख रुपये अनुदान देण्यात आले आहे.
कृषी यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी यंदा ४ कोटी ४६ लाख रुपये अनुदान वितरीत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील बोरसुरी डाळ, पटडी चिंच आणि कास्ती कोथींबीर या तीन उत्पादनांना जीआय मानांकन मिळाले आहे. ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे मंत्री बनसोडे यांनी यावेळी नमूद केले. क्रीडा व युवक कल्याण मंत्री बनसोडे यांनी यावेळी पोलीस परेडचे निरीक्षण केले. प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी नवदीप अग्रवाल यांनी पोलीस परेडचे नेतृत्व केले. पोलीस पथकांसह गृहरक्षक दल, राष्ट्रीय छात्र सेना व उदगीर सैनिक विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय, स्वरस्वती विद्यालयाचे विद्यार्थी, पोलीस बॅण्ड पथक, श्वान पथक, वज्र वाहन, बॉम्ब शोधक पथक, जलद प्रतिसाद पथक, रुग्णवाहिका, अटल भूजल योजना चित्ररथ, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस, ईव्हीएम जनजागृती चित्ररथ या पथसंचालनात सहभागी झाले होते.
प्रजासत्ताक दिन सोहळ्याला उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांच्या वीर पत्नी, वीरमाता, वीरपिता यांची ना. बनसोडे यांनी भेट घेवून त्यांना शुभेच्छा दिल्या. प्रशासनाच्या विविध विभागात उत्कृष्ठ कामगिरी करणा-या अधिकारी, कर्मचारी यांचा यावेळी मंत्री बनसोडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सदानंद माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी झांज पथकाचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR