22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeसंपादकीय विशेषलातूर येथे ६ वी अ. भा. धम्म परिषद

लातूर येथे ६ वी अ. भा. धम्म परिषद

२५ डिसेंबर रोजी लातूर येथे होणा-या अ. भा. धम्म परिषदेच्या अनुषंगाने डॉ. सुरेश वाघमारे यांचा लेख.

सोमवार, दि. २५ डिसेंबर २०२३ रोजी बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने लातूर येथे पू. भिक्खू पय्यानंद महाथेरो यांच्या नेतृत्वाखाली व पू. भिक्खू डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली अ. भा. धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन जपानचे पू. भिक्खू व्हेन. जुनसेई टेरासावा यांच्या हस्ते होणार आहे. हिंदू राष्ट्रविषयक चर्चा, धर्मांतरबंदीचे पास होणारे कायदे या पार्श्वभूमीवर अशा धम्म परिषदांना महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे आज जे स्वत:ला बौद्ध म्हणून सांगतात पण त्यांचे आचरण खरेच बौद्ध धम्मानुसार आहे का? आजचा तरुण बौद्ध धम्माकडे वळत आहे का? या पार्श्वभूमीवर देखील धम्म परिषदेचे महत्त्व सांगता येईल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर २४ जानेवारी १९५४ रोजी केलेल्या भाषणात म्हणाले होते, ख-या अर्थाने बौद्ध धम्माला गतिमान करण्याचे काम तरुण पिढीला करावे लागणार आहे. त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या सुखाचा तयाग करणा-या कल्पक भिक्खूची नितांत गरज पडणार आहे. १९५६ रोजी धर्मांतर केले. त्यावेळी अनेक तरुण पुढे आले. बौद्ध भिक्खू पुढे आले पण आज तसे चित्र दिसत नाही. हे खरे असले तरी आज पू. भिक्खू पय्यानंद थेरो यांच्यासारख्या भिक्खूकडे पाहिल्यानंतर निश्चितच आशादायी चित्र दिसते. त्यांचे अथक कार्य तसेच बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबलमधील पदाधिकारी व त्यांच्या कार्यावर पे्रम करणारी अधिकारी, कर्मचारी मंडळी, सामान्य माणूस यामुळे पू. भिक्खू यांचे बळ वाढत आहे. त्यांच्या या कार्यात काही त्रुटी असल्या तरी त्या चार भिंतीच्या आत त्यांच्या लक्षात आणून द्यायला हरकत नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतरानंतरही काही पामरांना हा धम्म कळाला नाही, काहींना अर्धवट कळाला. त्यामुळे आज मानवमुक्तीच्या तथागताला सोडून पुन्हा लोक दगडाच्या देवाकडे वळू पाहत आहेत. आज अंधश्रद्धेच्या जाळ्यात पुन्हा अडकण्याचा मोह काही मंडळींना होत आहे. बौद्ध म्हणून सांगणारे काही लोक जात-पोटजातीचा विचार करताना आढळत आहेत. त्यामुळे राजकीय चळवळीप्रमाणेच धम्म चळवळीची अवस्था होत आहे. दोरा तुटलेल्या पतंगासारखी स्थिती झाली आहे. यावर विचार करण्याची, याविरुद्ध एकजुटीने कार्य करण्याची गरज आहे. हे करता येत नसेल तर किमान पय्यानंदसारखे पू. भिक्खू जे करताहेत त्यांना बळ द्या आणि बळही देता येत नसेल तर किमान विरोधासाठी विरोध होऊ नये. भिक्खू म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करू पाहणारा सारथी, भिक्खू म्हणजे दु:खातून पैलतीरावर घेऊन जाणारी तथागतांची विचार नाव आहे. या भूमिकेतून भिक्खूंचा आदर व्हायला हवा.

ज्याप्रमाणे संविधानाचे प्रिअंबल हे संविधानाचे सार आहे त्याचप्रमाणे बौद्ध धम्माचे सार बावीस प्रतिज्ञा आहेत. त्यामुळे या बावीस प्रतिज्ञा समजून घेऊन आचरण केले पाहिजे. या बावीस प्रतिज्ञा म्हणजे पक्षाचा जाहीरनामा नाही तर सुखी जीवन जगण्याचा, जगू देण्याचा दस्तावेज आहे आणि दस्तावेज समजावून सांगण्यासाठी बौद्ध भिक्खूंची जबाबदारी आहे त्याचप्रमाणे ज्यांना या बावीस प्रतिज्ञा समजल्या आहेत व जे त्यानुसार आचरण करतात त्यांनी इतरांना सांगण्याची गरज आहे. अशा परिषदांमधूून या संदर्भात अधिक चर्चा होण्याची गरज आहे आणि यातूनच ख-या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कल्पनेतील धम्म चळवळ साकारणार आहे. धम्म चळवळ गतिमान होणार आहे. हाच विचार या ऐतिहासिक अ. भा. धम्म परिषदेतून मांडला जाईल अशी अपेक्षा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR