लातूर : प्रतिनिधी
लातूरचे नवनिर्वाचित खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी दि. १३ सप्टेंबर रोजी लातूर एमआयडीसीतील लातूर रेल्वे कोच फॅक्टरीला भेट देऊन पाहणी केली. फॅक्टरीमधील सद्यस्थितीचे अवलोकन केल्यानंतर या ठिकाणी स्थानिक लोकांच्या हाताला काम मिळावे, अशी त्यांनी तेथील व्यवस्थापनाला सूचना केली आहे,
लातूर एमआयडीसी परिसरात लातूर कोच फॅक्टरी उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे, ही फॅक्टरी लवकरच सुरु होईल, असे अनेक वेळा सांगितले गेले, फॅक्टरीच्या शुभारंभाचे कार्यक्रमही झाले. मात्र अद्याप येथून कोचची निर्मिती झालेली नाही. रशियन व्यवस्थापनाच्या माध्यमातून ही फॅक्टरी आता चालवली जाणार आहे. या संदर्भाने शुक्रवारी लातूरचे नवनिर्वाचित खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी सदरील फॅक्टरीला भेट देऊन, तेथील सद्यस्थितीची पाहणी केली,
फॅक्टरी उभारणीच्या वेळी स्थानिक लोकांच्या हाताला काम मिळेल असे केंद्र आणि राज्य शासनाकडून आश्वासन देण्यात आले होते, आता ही फॅक्टरी रशियन व्यवस्थापनाच्या अधिपत्याखाली चालवली जाणार आहे, या पार्श्वभूमीवर या फॅक्टरीत स्थानिक तरुणांना नोकरी व रोजगार मिळावा, येथील एमआयडीसील पूरक उद्योगांना साहित्य पुरवठ्याची संधी देण्यात यावी, अशी अपेक्षा डॉ. शिवाजी काळगे यांनी यावेळी व्यवस्थापणाकडे व्यक्त केली.
लातूर येथील आयटीआय व इतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये, लातूर कोच फॅक्टरीला आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ निर्माण करणारे कोर्सेस सुरु करण्यात यावेत व प्राधान्याने स्थानिकांना हे प्रशिक्षण देण्यात यावे, अशी सूचनाही यावी डॉ. शिवाजी काळगे आणि केली आहे.