जळकोट : ओमकार सोनटक्के
लातूर रोड जळकोट बोधन हा १३४ किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग असून २०१६ च्या रेल्वे अर्थसंकल्पात तत्कालीन रेल्वेमंत्र्यांनी मंजूर केला होता, या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी १९ लाखांचा निधी मंजूर झाला. यानंतर रेल्वेमंत्री प्रभू यांच्याकडील रेल्वे खाते गेले. यानंतर ९ वर्षापासून काम रखडले होते. यानंतर १० अर्थसंकल्पीय अधिवेशन झाले मात्र यासाठी बजेट उपलब्ध करण्यात आले नाही. २०२३ मध्ये रेल्वे मार्गाच्या अंतिम सर्वेक्षणासाठी निधी मंजूर करण्यात आला होता. या रेल्वेमार्गासाठी खासदार शिवाजीराव काळगे यांना पुढाकार घ्यावा लागणार आहे .
हा मार्ग केंद्र सरकारच्या मुख्य अजेंड्यावर आहे. आता येणा-या हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकार या निजामकालीन रेल्वे मार्गासाठी निधी उपलब्ध करेल, अशी अपेक्षा जळकोटसह इतर चार तालुक्यातील नागरिकांना आहे. हा रेल्वेमार्ग अतिशय महत्वाचा आहे. थेट कोकण ते विशाखापटनम ही दोन बंदरे एकमेकांना जोडली जाणार आहेत. या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी निधीची तरतूद करण्यात आली . या रेल्वेमार्गासाठी साधारणपणे २५०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. पहिल्या टप्प्यात केलेल्या सर्वेक्षणात हा रेल्वेमार्ग १३४ किलोमीटर लांबीचा होणार आहे. यासाठी २४०९ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने हा सर्वे करण्यात आला.
बोधन येथून मुखेड , जळकोट मार्गे पुढे चाकूर जवळ हा रेल्वे मार्ग जोडला जाणार आहे. लातूर रोड जळकोट बोधन या रेल्वे मार्गासाठी ७३२ हेक्टर एवढी जमीन लागणार आहे. या मार्गावर जवळपास ९३ पुल होणार आहेत. यातील पंधरा पुल हे मोठे आहे तर ७८ पुल छोटे आहेत . या रेल्वेमार्गाच्या एका किलोमीटर साठी १७ कोटी ९१ लाख रुपयाचा निधी लागणार आहे. हा सर्व आराखडा तयार करण्यात आला आहे मात्र केंद्र सरकारकडून तसेच रेल्वे मंत्रालयाकडून निधीची तरतूद मात्र करण्यात आली नाही यामुळे गत दहा वर्षापासून या रेल्वे मार्गाचे काम रखडलेले आहे.