लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातील नागरिकांना महानगरपालिकेतून बांधकाम परवाना मिळवण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषत: लो रिस्क आणि मॉडरेट रिस्क बांधकाम परवानग्यांमध्ये होणा-या विलंबाबद्दल लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव यांनी महापालिका प्रशासनाला निवेदन देऊन या प्रश्नावर त्वरित तोडगा काढण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या एकात्मिक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीनुसार लो रिस्क आणि मॉडरेट रिस्क बांधकाम परवानग्या देण्यासाठी स्वतंत्र कार्यपद्धती बीपीएमएस निश्चित केली आहे. या नियमानुसार १५०० चौरस फुटांपर्यंतच्या बांधकामासाठी परवानगी देण्याचे अधिकार वास्तुविशारद आणि अभियंत्यांना देण्यात आले आहेत, तर १५०० ते ३००० चौरस फुटांपर्यंतच्या भूखंडासाठी आवश्यक कागदपत्रे तपासणी करण्याचे अधिकार नगररचनाकार आणि नगररचनाकार यांनी नियुक्त केलेल्या व्यक्तींकडे आहेत. परंतु लातूर शहर महानगरपालिका बांधकाम परवानगीसाठी ही युडीपीसीआर मधील नवीन योजना लागू करण्यात चाल ढकल करीत आहे.
राज्यातील ब-याच महानगरपालिकामध्ये ही लो रिस्क आणि मॉडरेट रिस्क बांधकाम परवानगी योजना लागू करण्यात आली असून हजारो नागरिकांनी त्याचा लाभ घेतला आहे. परंतू लातूर मनपा प्रशासन या बाबतीत उदासीन असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे युडीपीसीआरमधील परिशिष्ट क नुसार नागरिकांना बांधकाम परवाना देण्यात यावा आणि नागरिकांना सुलभ आणि सोयीची सुविधा उपलब्ध करून द्यावी जेणे करून नागरिकांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागणार नाही त्यांची गैरसोय होणार नाही. यासाठी महापालिका प्रशासनाने त्वरित लक्ष घालून नागरिकांना न्याय द्यावा, अशी मागणी लातूर काँग्रेसने निवेदनाद्वारे केली आहे.
काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. किरण जाधव यांनी या प्रश्नावर महापालिका प्रशासनाकडे तातडीने बैठक घेऊन मार्ग काढण्याची विनंती केली आहे, जेणेकरून नागरिकांना विनाकारण त्रास होणार नाही. अन्यथा काँग्रेस पक्ष यावर तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंखे, माजी उपमहापौर कैलास कांबळे, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण कांबळे, विष्णुकांत धायगुडे, सिकंदर पटेल, शरद देशमुख, प्रवीण सूर्यवंशी, नागसेन कामेगावकर, आसिफ बागवान, यशपाल कांबळे,राम स्वामी, किरण बनसोडे, अॅड. गणेश कांबळे, पवन गायकवाड, विजय टाकेकर, आकाश मगर यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.