27.7 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeलातूरलातूर शहर अपघात मुक्त करण्याचा संकल्प 

लातूर शहर अपघात मुक्त करण्याचा संकल्प 

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातून जाणारे महामार्ग अत्यंत उच्च दर्जाचे झाले असून त्यामुळे रोड सेफ्टी हा विषय अत्यंत महत्वाचा झाला आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये याबाबतची जागृती करणे अत्यंत गरजेचे आहे. नुतन वर्षाचा संकल्प करु या, लातूर शहर अपघात मुक्त्त करु या, अशी साद जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना घातली आहे.
राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह दि १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित केला आहे. जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित उद्घाटन समारंभात जिल्हाधिकारी बोलत होत्या. यावेळी मंचावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, महानगरपालिकेचे आयुक्त्त बाबासाहेब मनोहरे, अपर जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अजय देवरे, प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन गोतपगार, जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. प्रदीप ढेले, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग एम. एम. पाटील, विभागीय वाहतूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, संदीप पडवळ, सहा प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल, सहा प्रादेशिक परिवहन कार्यालय, गणेश कदम उपस्थित होते.
अपघातास आळा घालणे हे केवळ वाहन चालकांचे कर्तव्य नसून प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य आहे, असे सांगून आज कालच्या युवा पिढीमध्ये वाहने अतिवेगाने चालविण्याची क्रेझ असल्याने अपघातांच्या संख्येत दुर्देवाने वाढ होत असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांनी सांगितले. यासाठी युवा पिढीमध्ये रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती होणे गरजेचे असून प्रत्येक शाळामध्ये रस्ता सुरक्षा शिकविण्याची गरजही त्यांनी यावेळी विशद केली. प्रादेशिक परिवहन कार्यालय, लातूर येथे उभारण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा गॅलरीचे विशेष कौतूक करुन याच धर्तीवर लातूर शहरात अन्य काही ठिकाणी अशा गॅलरी उभारण्यात याव्यात अशा सूचना केल्या.
अपघातला कारणीभूत ठरणारे घटक आणि रस्ता अपघात आणि सुरक्षा हा गंभीर विषय त्यांनी अतिशय मार्मिकपणे सोदाहरण देऊन पटवून दिला. लातूर जिल्ह्यात एकही अपघात होणार नाही, अशी जाणीव जागृती करावी त्याला सर्वसामान्यांनी हे सर्व आपल्या सुरक्षिततेसाठी आहे याची जाणीव ठेवून सर्व नियम अवगत करुन घ्यावेत, असे आवाहनही जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी यावेळी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR