27.4 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeलातूरलातूर सिटी रिपोर्ट कार्डचे प्रकाशन

लातूर सिटी रिपोर्ट कार्डचे प्रकाशन

लातूर : प्रतिनिधी
काँग्रेस महाविकास आघाडीचे लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील लातूर ग्रामीणचे उमेदवार आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या प्रचारार्थ कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार दि. १७ नोव्हेंबर रोजी लातूरच्या दौ-यावर आले होते त्यादरम्यान काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या हस्ते माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या २०१९ ते २०२४ या पाच वर्षातील लातूर सिटी रिपोर्ट कार्डचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी कर्नाटकच्या महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेंबाळकर, माजी मंत्री आमदार अमित देशमुख, आमदार धिरज देशमुख, राष्ट्रीय काँग्रेसचे निरीक्षक वसंतकुमार, उल्हास पवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव,  शेकाप नेते अ‍ॅड. उदय गवारे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले, कर्नाटक व तेलंगणामधील काँग्रेसच्या राज्य सरकारांनी जनसामान्यांसाठी सरकारी नोक-या, महालक्ष्मी योजना, जातीय जनगणना, महिला शक्तीला आधार, इंदिरम्मा इंडलू, यंग इंडिया, गृहज्योती, मोफत आरोग्य विमा, गुंतवणुक आणि सिंचनाच्या सुविधा निर्माण करण्याचे आश्वासन निवडणुकीत दिले होते. त्या आश्वासनांची पुर्तता करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातही काँग्रेस महाविकास आघाडीने पंचसुत्री विकासाची जाहिर केली आहे. ही पंचसुत्री जनसामान्यांचा सर्वांगीण विकास साधणारी आहे. मुळातच महाराष्ट्रातील जनता भाजपा महायुतीच्या भ्रष्ट कारभाराला त्रासली आहे. भ्रष्टाचाराने संपूर्ण महाराष्ट्र पोखरुन गेला आहे. बेकारी वाढली आहे. महागाईने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता काँग्रेस महाविकास आघाडीला भरभरुन मतदान करेल. महाविकास आघाडीच्या १७५ च्याही पुढे जागा निवडून येतील, असे ते म्हणाले.
काँग्रेस महाविकास आघाडीचे लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार माजी मंत्री आमदार अमित देशमुख व लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील लातूर ग्रामीणचे उमेदवार आमदार धिरज देशमुख यांनी आापापल्या मतदारसंघात उत्कृष्ट विकास कामे केली आहेत. या दोघांचाही मोठ्या मताधिक्क्याने विजय होईल, असे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले. यावेळी प्रा. प्रविण कांबळे, प्रविण सूर्यवंशी, व्यंकटेश पुरी, पंडित कावळे, अकबर माडजे यांची उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR