लातूर : प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या १०० वर्षांनंतर लातूर शहर कसे असेल, याबाबत तज्ज्ञांच्या समितीतून प्रस्तावित आराखडा तयार करण्यात आला आहे. यातील मुद्दे आणि विकासाची कास असलेल्या आराखड्याचा उपयोग प्रशासनालाही होईल, असा दिशादर्शक हा प्रस्ताव असल्याचे मत माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केले.
शहराच्या विकासासोबतच अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कोणत्या बाबींवर लक्ष केंद्रीत करुन लातूरकरांना प्रवास करावा लागणार आहे. याबात लातूर @ २०४७ या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, प्रशिक्षित जिल्हाधिकारी नमन गोयल, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, विवेकनांद संस्कार केंद्राचे अध्यक्ष अॅड. संजय पांडे, पत्रकार प्रदीप ननंदकर यांची उपस्थिती होती.
शहरातील विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी विकास कामे आणि आव्हाने याचा लेखाजोखा मांडला आहे. यात पत्रकार अरुण समुद्रे यांनी शहरातील वाहतूक, ललित शहा यांनी बाजारपेठ, विशाल अग्रवाल यांनी व्यापार, रतन बिदादा यांनी उद्योग, प्रकाश कासट यांनी औद्योगिक वसाहत, रमेश बियाणी यांनी शिक्षण तर डॉ. डी. एन. चिंते यांनी आरोग्याविषयी लातुरातील सोई-सुविधा आणि भविष्यातील आव्हाने याविषयी मनोगत व्यक्त केले. स्वातंंत्र्यापासून लातूर शहराला एक वेगळी संस्कृती आहे. या वेगळेपणामुळे प्रत्येक क्षेत्रात लातूरने मराठवाड्यात वेगळे स्थान निर्माण केले आहे. सन २०४७ मध्ये लातूर शहर कसे असेल, याचा विचार करीत असताना विकासाबरोबर तो करीत असताना आपणास आनंद मिळातो की नाही, हे पाहणेदेखील महत्वाचे आहे.