पुणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला (एसटी) पुणे एसटी विभागातून सर्वाधिक महसूल मिळत आहे. दुसरीकडे पुण्यातून राज्य आणि राज्याबाहेर जाणा-या प्रवाशांची संख्या जास्त आहे.
तरीही पुणे विभागात एसटी बसची संख्या आणि वयोमर्यादा ओलांडल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. शिवाय परिवहन राज्य मंत्र्यांकडून एसटी बस मिळण्यासाठी दोन वेळा बैठका घेण्यात आल्या. तरीही नव्या ‘लालपरी’साठी प्रतीक्षाच करण्याची वेळ पुणे विभागावर आली आहे.
एसटीच्या पुणे विभागात सध्या ७३० बस आहेत. या सर्व बस १२ वर्षे वयोमर्यादा ओलांडलेल्या आहेत. कोरोनापूर्वी पुणे विभागात ११०० बस होत्या. मात्र प्रवासीसंख्या कमी होती. आता उलट परिस्थिती आहे. प्रवासीसंख्या दीडपटीने वाढली आहे.
एसटी बस मात्र ४०० कमी झाल्या आहेत. त्यामुळे नियोजन करताना प्रशासनावर ताण पडत आहे. शिवाय राज्य सरकारच्या विविध सवलतींमुळे एसटीला प्रवाशांची संख्या लाखोंनी वाढली. त्यात उपलब्ध असलेल्या ७३० बस बारा वर्षे वयोमर्यादा ओलांडलेल्या आहेत. त्यामुळे जर्जर आणि खिळखिळ्या झालेल्या बस मार्गावर धावत आहेत. त्यामुळे नव्या बस कधी मिळणार यासाठी वाट पाहण्याची वेळ एसटी प्रशासनावर आली आहे.