नाशिक : प्रतिनिधी
लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये काल कांद्याच्या दरात घसरण झाल्याने संतप्त शेतक-यांनी पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले’ स्टाईल आंदोलन करत केंद्र व राज्य सरकारचा निषेध केला होता. यावेळी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे व माजी मंत्री छगन भुजबळ यांनी फोनद्वारे शेतक-यांशी संवाद साधून विधानसभेत कांद्याबाबत प्रश्न मांडू असे सांगितल्यानंतर शेतक-यांनी आंदोलन मागे घेतले होते. आज कांदा लिलाव पूर्ववत सुरू झाला आहे.
लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतक-यांनी केलेल्या आंदोलनानंतर आज लिलाव पूर्ववत सुरू झाले आहेत. मात्र कालपेक्षा आज क्विंटलमागे २०० रुपये भावात घसरण झाली असून आज कमीत कमी ११०० आणि जास्तीत जास्त १७०० तर सरासरी १४०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. त्यामुळे उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने शेतक-यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच कांद्याला २५ रुपये प्रति किलो हमीभाव द्यावा आणि कांद्यावर लागू केलेले २० टक्के निर्यात शुल्क तात्काळ रद्द करावे, अशी मागणी शेतक-यांची आहे.
३००० रुपये क्विंटल हमी भाव पाहिजे
आम्हाला क्विंटलमागे सरासरी दोन हजार रुपये खर्च येतोय, आमची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी आहे की, आम्हाला तीन हजार क्विंटल रुपये हमीभाव मिळाला पाहिजे. तसेच सध्या सरकारने लावलेले २० टक्के निर्यात शुल्क तातडीने रद्द करावे जेणे करून मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होऊन कांद्याचे भाव स्थिर होण्यास मदत मिळेल, असे महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी म्हटले आहे.