भारतीय हवामान विभागाने येत्या काही महिन्यांत देशभरात सामान्यपेक्षा जास्त तापमान राहील, असा अंदाज व्यक्त करत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक असेल असे आयएमडी (भारतीय हवामान विभाग)ने म्हटले आहे. एप्रिल ते जून दरम्यान देशात सहा ते दहा दिवस उष्णतेची लाट पहावयास मिळू शकते. राज्यात एप्रिल ते जून दरम्यान तापमान नेहमीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. मध्य आणि पूर्व भारत तसेच वायव्य भागात उष्णतेची लाट अधिक दिवस राहील. देशात बहुतांश भागात किमान तापमानही अधिक असेल. देशात साधारणपणे एप्रिल ते जून या कालावधीत चार ते सात दिवस उष्णतेची लाट असते.
परंतु याच कालावधीत उत्तर आणि पूर्व भारत, मध्य भारत आणि वायव्य भारतातील बहुतांश भागात सामान्यपेक्षा दोन ते चार दिवस जास्त उष्णतेच्या लाटेचा अनुभव येण्याची शक्यता आहे. राजस्थान, गुजरात, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडूच्या उत्तरेकडील भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचे दिवस सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार एप्रिलमध्ये एक ते तीन उष्णतेच्या लाटेचे दिवस असतात. परंतु यंदा ते तीन ते सहा दिवसांपर्यंत वाढू शकतात. सकारात्मक बाब म्हणजे मान्सून हंगामावर एल निनोचा परिणाम होण्याची शक्यता नाही. यंदाच्या उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटेचे दिवस अधिक असण्याची शक्यता असल्याने देशात वीज मागणीत ९ ते १० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. गतवर्षी ३० मे रोजी देशात सर्वाधिक वीज मागणी २५० गिगावॅट्स होती. हवामान बदलामुळे सतत वाढत जाणारी उष्णता हे विजेच्या वाढत्या मागणीचे मुख्य कारण आहे.
यंदा गतवर्षीच्या तुलनेत अधिक वीज मागणी होण्याची शक्यता आहे. मार्च महिनाअखेर उन्हाच्या तीव्रतेने आपले रूप दाखवण्यास सुरुवात केली आहे. ३० मार्चला तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. सध्या सकाळपासूनच तीव्र उन्हामुळे लोक घरातच राहणे पसंत करत आहेत. रात्री किंचित गारवा जाणवत असला तरी दिवसा उन्हाच्या कडाक्याने लोकांचे हाल सुरू आहेत. बदलत्या हवामानाचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत आहे. अत्याधिक उष्णतेमुळे सर्दी, खोकला आणि ताप यासारख्या समस्या वेगाने पसरत आहेत. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी बाहेर पडताना छत्री, टोपी, गमछा वापरा, हलक्या रंगाचे सुती कपडे परिधान करा, कॅफिन आणि अल्कोहलचे सेवन टाळा असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.ठाणे जिल्ह्यासह कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर भागात १० मार्चच्या सुमारास उष्णतेची मोठी लाट आली होती. ही लाट तीन ते चार दिवस सलग राहिल्याने या काळात पारा ४२ अंश सेल्सिअसपर्यंत गेला होता. होळीनंतर ही उष्णतेची लाट ओसरली होती.
आता पुन्हा उष्णता वाढण्यास सुरुवात झाली आहे. हवामानाच्या शास्त्रीय विश्लेषणानुसार मार्च महिन्यात भारतीय उपखंडात प्रतिचक्रवाती प्रणाली तयार होते. ही अत्यंत सामान्य गोष्ट आहे. या प्रणालीमुळे उत्तर-ईशान्येकडून कोरडे, उष्ण वारे वाहू लागतात. या वा-यांना रोखू शकणारे थंड वारे या काळात नसतात. त्यामुळे तापमान सरासरीपेक्षा चार ते पाच अंशांनी वाढते. एप्रिल महिन्यात किमान दोन ते तीन उष्णतेच्या लाटा येऊ शकतात. त्यांची संख्या कमी-जास्त होऊ शकते. या महिनाअखेरपर्यंत तरी पावसाची कोणतीही शक्यता अजून तरी दिसत नाही. असे असले तरी एप्रिल महिन्याची सुरुवात वळीव पावसाने होईल, राज्यात विजांच्या कडकडाटासह वळीव पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हिमालय ते उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात सक्रिय झाला आहे. तामिळनाडू राज्यातही कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने देशातील बहुतांश भागात वळवाचा पाऊस होईल असा अंदाज आहे. एप्रिलमध्ये देशभरात ३९ टक्के पाऊस पडेल असा अंदाज आहे. हवामान विभागाने महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. वादळी वा-यासह जोरदार पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे आणि ओडिशापासून तामिळनाडूपर्यंत हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने पुढील पाच दिवस राज्यात ढगाळ वातावरण असणार आहे. त्यामुळे वादळी वारे, ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज आहे. या काळात राज्यात कमाल तापमान ३५ ते ४२ अंश सेल्सिअसदरम्यान राहील. बाष्पयुक्त वातावरण आणि तापमानवाढीमुळे जास्त उंचीचे ढग निर्माण होत आहेत. त्यामुळे पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण राहील. जागतिक हवामान संघटनेच्या अहवालानुसार २०२४ हे वर्ष आतापर्यंत नोंदवलेले सर्वांत उष्ण वर्ष ठरले आहे. या वर्षी पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान १.५५ अंश सेल्सिअसने जास्त होते. ही वाढ हरितगृह वायूच्या प्रमाणात झालेली झपाट्याने वाढ आणि ला निना व एल निनोमध्ये झालेल्या बदलामुळे झाली. वाढत्या उष्णतेमुळे दुष्काळ, वादळ, पूर यासारख्या हवामान आपत्तीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. वातावरणात कार्बन डाय ऑक्साईड, मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड या हरितगृह वायूंच्या प्रमाणात विक्रमी वाढ झाली. या वायूंमुळे वातावरणातील उष्णता दीर्घकाळ टिकून राहते. जागतिक तापमानवाढीचे हे एक प्रमुख कारण आहे.
वाढत्या हवामान बदलामुळे भविष्यात उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. या संकटाला आळा घालायचा असेल तर हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करणे आणि पर्यावरणपूरक धोरण अवलंबणे अत्यावश्यक आहे. राज्यात उष्णतेच्या लाटेमुळे शेतकरी, बांधकाम कामगार, बाहेर इतर काम करणा-या व्यक्तींना विशेष धोका आहे. उच्च तापमानामुळे उष्माघात, निर्जलीकरण आणि इतर आरोग्य समस्यांचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्रातील मोठ्या शहरांतील लोकसंख्येची घनता, फसलेले शहर नियोजन, नाहीसा होत असलेला हरित पट्टा आणि हवेतील आर्द्रतेमुळे या वाढत्या तापमानाचा परिणाम नागरिकांना सहन करावा लागत आहे. एकंदरीत यंदाच्या उन्हाळ्यात अंगाची लाही लाही होणार असे दिसते.