लाहोर : वृत्तसंस्था
लाहोरच्या औद्योगिक क्षेत्रात मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार भारतीय ड्रोन्सने हा हल्ला केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय ड्रोनने लाहोर मधील एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट केली होती. त्यानंतर याच परिसरात पाकिस्तानचे अत्यंत महत्त्वाचे स्थळ उध्वस्त झालं आहे. मात्र हा स्फोट नेमका कशामुळे झाला हे जरी अद्याप समोर आलेलं नसलं तरी दहशतवाद पोसणा-या पाकिस्तानच्या मुळावर हा मोठा आघात मानला जात आहे.
पाकिस्तानच्या सरगोधा हवाई तळावर मोठा स्फोट करण्यात आला आहे. याआधी पाकिस्तानचे पाच हवाई तळ नष्ट केल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक जबरदस्त हादरा भारतीय सैन्याने दिला आहे. या स्फोटात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाकिस्तानची खुमखुमी तिस-या दिवशीही भारतीय सैन्यांनी पुन्हा एकदा जिरवली आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानमधील अनेक लष्करी तळ नेस्तनाबूत केल्याचीही माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा ड्रोन लॉन्च करण्याचा तळ बेचिराख करण्यात आला आहे.
दरम्यान, पाकिस्तानकडून तिस-या दिवशीही ड्रोन आणि हलक्या विमानांद्वारे हल्ले सुरूच असल्याचे बघायला मिळाले. पाकिस्तानकडून ड्रोन आणि हलक्या विमानांद्वारे हे हल्ले केले जात आहेत. भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध करुन ही माहिती दिली आहे.
भारताच्या एअर बेसवर हल्ला
पाकिस्तानकडून शुक्रवारी रात्री भारताच्या हवाई तळांवर हल्ले करण्यात आले होते. पाकिस्तानकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला होता. यामध्ये पाकिस्तानच्या फतेह-१ या क्षेपणास्त्राचाही वापर करण्यात आला. जम्मू एअर बेस, उधमपूर एअर बेस, पठाणकोट एअर बेस, श्रीनगर एअर बेस आणि बियास या हवाई तळांवर पाकिस्तानी ड्रोन्सचा हल्ला झाला होता.