नवी दिल्ली : ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात आयकर विभागाने देशभरात मोठ्या प्रमाणात छापे टाकून शेकडो कोटींची रोकड आणि दागिने जप्त केले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० मे रोजी सायंकाळपर्यंत आयकर विभागाने लोकसभा निवडणुकीदरम्यान ११०० कोटी रुपयांची रोकड आणि दागिने जप्त केले आहेत. जे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा १८२ टक्के जास्त आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यानही आयकर विभागाने अशी कारवाई करून ३९० कोटी रुपयांची रोकड आणि दागिने जप्त केले होते.
निवडणूक आयोगाने यावर्षी १६ मार्च रोजी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या होत्या. त्यानंतरच देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली. तेव्हापासून आयकर विभागाने रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने एका ठराविक मर्यादेच्या पुढे नेणा-यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली होती. यात आयकर विभागाने १ हजार १०० कोटी रुपयांची रोकड आणि दागिने जप्त केले आहेत.
दिल्ली आणि कर्नाटकमध्ये सर्वाधिक जप्ती
मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्ली आणि कर्नाटकमध्ये जप्तीची सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. दोन्ही राज्यांत प्रत्येकी २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची रोकड आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत. तर तामिळनाडू दुस-या क्रमांकावर आहे, येथून १५० कोटी रुपये जप्त करण्यात आले. यानंतर आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि ओडिशामध्ये प्रत्येकी १०० कोटींहून अधिक किमतीची रोकड आणि दागिने एकत्रितपणे जप्त करण्यात आले आहेत.