17.3 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रलोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान

लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान

शरद पवारांचा गंभीर आरोप

मुंबई : अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठीचे महाराष्ट्रातील मतदान आज आटोपले आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांमध्ये पाच टप्प्यांत मतदान झाले. दरम्यान, मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतरही आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार यांनी गंभीर आरोप केले आहेत. राज्यातील बीड आणि बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये बोगस मतदान झाल्याचा आरोप शरद पवार शरद पवार यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे.

शरद पवार यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज्यात बोगस मतदान झाल्याचा गंभीर आरोप केला. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील बीड, बारामती आणि पुणे हे मतदारसंघ वगळले तर राज्यात इतर ठिकाणी शांततेत मतदान झाले. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये कधीच पैशांचा वापर झाला नव्हता. मात्र या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर झाला. बारामतीमध्ये तर एक बँक रात्री दोन वाजताही उघडी होती. एवढंच नाही तर बारामती आणि बीड लोकसभा मतदारसंघांमध्ये बोगस मतदानाचे प्रकार घडले. बीडमध्ये तर बूथ कॅप्चरिंगची घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यामध्येही अशा प्रकारच्या घटना घडताना दिसल्या. त्यामुळे या प्रकारांमध्ये जे कुणी दोषी असतील, त्यांच्यावर करावी करण्यात यावी, अशी मागणीही शरद पवार यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर यंदाच्या लोकसभा निवड़णुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातील लढत ही शरद पवार आणि अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची झाली होती. बारामतीमध्ये शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आमने सामने आलेल्या होत्या. त्यामुळे येथील निवडणूक चुरशीची झाली होती. तसेच येथील प्रचारात अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते. तर बीडमध्येही भाजपाच्या पंकजा मुंडे आणि शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे यांच्यात लढत झाली होती. तसेच येथील निवडणुकही अनेक आरोप प्रत्यारोपांमुळेही गाजली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR