नवी दिल्ली : वृत्तसंस्था
वंदे भारत स्लीपर ट्रेनची प्रतीक्षा आता संपली आहे. वंदे भारत रेल्वे गाड्यांच्या यशानंतर लवकरच वंदे भारत स्लीपर गाड्या येणार आहेत. भारताची पहिली वंदे भारत रेल्वे चालू वर्षाच्या शेवटीपर्यंत सुरु होईल, अशी माहिती रेल्वे अधिका-यांनी दिली.
इंटीग्रल कोच फॅक्ट्री चेन्नईचे महाप्रबंधक यू. सुब्बा राव म्हणाले की, पहिल्या वंदे भारत ट्रेनची निर्मिती भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेडच्या बंगळूरु येथील वर्कशॉपमधून होईल. २० सप्टेंबरपर्यंत या रेल्वेची निर्मिती होण्याचा अंदाज आहे.
राव पुढे म्हणाले की, ‘बीईएमएल’कडून रेल्वे डब्यांची बांधणी होत आहे. आम्हाला आशा आहे की, २० सप्टेंबरपर्यंत डबे चेन्नईतल्या आयसीएफमध्ये पोहोचतील. त्यानंतर रेक निर्मिती, अंतिम परीक्षण आणि इतर कामे उरकली जातील. त्यासाठी साधारण १५ ते २० दिवस लागू शकतात. त्यानंतर मुख्य लाईन परीक्षण होईल, त्यात दोन महिने जातील.
मे २०२३ मध्ये आयसीएफ चेन्नईने बीईएमएल लिमिटेडला १६ कारच्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचे १० रेक डिझाईन आणि निर्माण करण्यासाठी आदेश दिले होते. ही ट्रेन १६० किलोमीटर प्रतितास या वेगाने धावण्यासाठी सक्षम आहे.
राव म्हणाले की, ही पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन आहे, म्हणूनच त्यासाठी जास्तीचा वेळ खर्ची पडत आहे. युरोपिय मानकांना खरी उतरणारी ही ट्रेन असेल. डिसेंबर २०२४ पर्यंत सर्व तपासण्या आणि ट्रायल रननंतर स्लीपर ट्रेन प्रवाशांसह धावेल.