32 C
Latur
Thursday, April 3, 2025
Homeराष्ट्रीयवक्फचा कायदा सर्वांना मान्य करावा लागेल

वक्फचा कायदा सर्वांना मान्य करावा लागेल

अमित शाह, सरकारी किंवा दुस-याच्या मालकीच्या जमिनीचे दान करता येत नाही
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयकावर चर्चा झाली. या चर्चेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तुम्ही तुमच्या मालकीच्या संपत्तीचे दान करू शकता, सरकारी जमिनीचे नाही. वक्फ म्हणजे धर्मादाय. यात व्यक्ती धार्मिक कार्यासाठी दान करते. दान त्याच गोष्टीचे करता येते, जी आपली आहे. मी सरकारी किंवा दुस-याच्या मालकीची संपत्ती दान करू शकत नाही. याच मुद्यावर सगळी चर्चा आहे. या सुधारणेला विरोध करणे गैर आहे. आता संसदेने बनवलेला कायदा सर्वानाच मान्य करावा लागेल, असे अमित शाह म्हणाले. दरम्यान, वक्फ विधेयकावरून विरोधकांनी सरकारच्या भूमिकेवर हल्ला चढवला. त्यामुळे लोकसभेत गदारोळ झाला.

केंद्रीय संसदीय मंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधेयक लोकसभेत मांडले. त्यानंतर यावर चर्चा सुरू झाली. यावेळी अमित शाह यांनी मी या विधेयकाला समर्थन देण्यासाठी उभा आहे. दुपारी १२ वाजल्यापासून सुरू असलेली चर्चा मी ऐकत आहे. काही सदस्यांच्या मनात गैरसमज आहेत. काही जण राजकीय फायद्यासाठी समाजात चुकीची माहिती पसरवत आहेत. हा कायदा मुस्लिम बांधवांच्या धार्मिक कामात आणि त्यांनी दान केलेल्या संपत्तीत हस्तक्षेप करतो, असा गैरसमज पसरवला जात आहे. अल्पसंख्याकांना घाबरवून मतांची बँक तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण वक्फमध्ये कोणत्याही गैर-मुस्लिमाची नेमणूक होणार नाही. धार्मिक संस्थांच्या व्यवस्थापनासाठी गैर-मुस्लिमांना नियुक्त करण्याचा कोणताही विचार नाही, असे म्हटले.
वक्फ हा अरबी शब्द आहे. वक्फचा इतिहास काही हदीसांशी (इस्लामी धर्मग्रंथ) जोडलेला आहे. आजकाल वक्फ म्हणजे अल्लाहच्या नावाने संपत्ती दान करणे. धार्मिक कार्यांसाठी संपत्ती दान करणे म्हणजे वक्फ. इस्लामचे दुसरे खलीफा उमर यांच्या काळात वक्फ अस्तित्वात आला. आजच्या भाषेत वक्फ म्हणजे धर्मादाय नोंदणी. यात व्यक्ती आपली संपत्ती, जमीन धार्मिक आणि सामाजिक कामांसाठी दान करते. ती परत घेण्याचा कोणताही उद्देश नसतो. दान करणारा खूप महत्त्वाचा असतो. दान त्याच गोष्टीचे करता येते जी आपली आहे. मी सरकारी संपत्ती दान करू शकत नाही किंवा दुस-या कोणाच्या मालकीची संपत्ती दान करू शकत नाही, असे शाह म्हणाले.

कायद्याद्वारे धार्मिक
कामात हस्तक्षेप नाही
वक्फ परिषद आणि वक्फ बोर्डची स्थापना १९९५ मध्ये झाली. हा कायदा मुस्लिमांच्या धार्मिक कामात हस्तक्षेप करतो, हे चुकीचे आहे. काही लोक अल्पसंख्याकांमध्ये भीती निर्माण करत आहेत आणि मतांसाठी खोट्या बातम्या पसरवत आहेत.

विधेयकामुळे वक्फच्या
संपत्तीचे योग्य व्यवस्थापन
वक्फ विधेयक का महत्त्वाचे आहे. वक्फचा कायदा म्हणजे कुणीतरी दान केलेली संपत्ती, तिचे व्यवस्थापन व्यवस्थित चालले आहे की नाही, कायद्यानुसार चालले आहे की नाही, हे पाहणे. दान ज्या कामासाठी दिले, इस्लाम धर्मासाठी दिले, गरिबांच्या मदतीसाठी दिले, त्या उद्देशासाठी उपयोग होत आहे की नाही, हे पाहण्याचे काम हे विधेयक करते. या विधेयकामुळे वक्फच्या संपत्तीचे योग्य व्यवस्थापन होईल. तसेच ज्या उद्देशांसाठी दान दिले, ते उद्देश पूर्ण होतील, असे अमित शाह म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR