नवी दिल्ली : वक्फ मंडळ सुधारणा कायद्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या आव्हान याचिकांवर आता न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर पुढच्या गुरुवारी (१५ मे) सुनावणी केली जाईल, असे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी सोमवारच्या सुनावणीदरम्यान नमूद केले. न्यायमूर्ती गवई १४ मे रोजी भारताच्या पुढील सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार असल्याने वक्फ प्रकरणाची सुनावणी नव्या सरन्यायाधीशांसमोरच होणार हे स्पष्ट झाले आहे.
याआधीच्या सुनावणीत सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने वक्फ कायद्यातील काही तरतुदींबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर केंद्र सरकारने या वादग्रस्त तरतुदी स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. सरन्यायाधीश संजीव खन्ना, न्यायमूर्ती संजयकुमार आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी पार पडली.
राज्यघटनेच्या कलम २५, २६, २९ आणि ३० अंतर्गत वक्फ सुधारणा कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. धर्म ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. अशा परिस्थितीत सरकार कायदा करून या प्रकरणात हस्तक्षेप करू शकत नाही, असा युक्तिवाद करून वक्फ कायद्याविरुद्ध अनेक स्वयंसेवी संस्था, मुस्लिम संघटना आणि काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत.