बंगळुरू : वृत्तसंस्था
बंगळुरूमधील एका मंदिर संमेलनाच्या उद्घाटन समारंभात कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांनी मोठे विधान केले आहे. जर वक्फ बोर्ड असू शकते तर सनातन बोर्ड का होऊ शकत नाही? असा सवाल देवकीनंदन ठाकूर यांनी करत मंदिरे सरकारच्या नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी आणि सनातन बोर्डाची स्थापना करण्यासाठी पुन्हा एकदा आवाज उठवला आहे.
मंदिरे सरकारच्या नियंत्रणातून मुक्त करण्याच्या मागणीवर जोर देत देवकीनंदन ठाकूर म्हणाले की, तिरुपती बालाजी मंदिरातून राज्य सरकारला दरवर्षी ५०० कोटी रुपये दिले जातात, मात्र ही रक्कम धर्म परिवर्तन आणि प्रसादात भेसळ करण्यासाठी वापरली जात होती.
याचबरोबर, सनातन बोर्डाची स्थापना झाली नाही, तर सरकारे बदलली की मंदिरांचे संवर्धन करणे कठीण होईल, ज्याप्रकारे आज संभलमध्ये स्थिती आहे, तशी स्थितीही परत येऊ शकते. मंदिरांच्या रक्षणासाठी हिंदूंना हारांसह भाले उचलावे लागतील आणि कोणत्याही परिस्थितीत देशातील शंकराचार्यांच्या अध्यक्षतेखाली सनातन बोर्डाची स्थापना करावी लागेल, असे देवकीनंदन ठाकूर म्हणाले.
नोव्हेंबर २०२४ मध्ये कथाकार देवकीनंदन ठाकूर यांनी सनातन धर्म संसद बोलावली होती. या धर्म संसदेत सहभागी होण्यासाठी मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, जेपी नड्डा, अखिलेश यादव अशा अनेक बड्या नेत्यांनाही निमंत्रणे पाठवण्यात आली होती. तसेच, देवकीनंदन ठाकूर सनातन बोर्ड स्थापन करण्याची मागणी करत होते. या धर्म संसदेत वक्फ बोर्डाच्या धर्तीवर सनातन बोर्ड स्थापन करण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय, लव्ह जिहाद-गोहत्या आणि कृष्णजन्मभूमी हा सुद्धा या धर्म संसदेचा अजेंडा होता.