वक्फ सुधारणा विधेयकावर चर्चा, विधेयकाच्या बाजूने २८८ मते
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी काल बुधवारी संसदेत वक्फ दुरूस्ती विधेयक सादर केले होते. त्यानंतर दुपारी १२ वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत या विधेयकावर सभागृहात जोरदार चर्चा झाली. यामध्ये सत्ताधारी खासदारांनी विधेयकाच्या बाजूने मते व्यक्त केली तर विरोधकांनी याला जोरदार विरोध केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विधेयकाचे जोरदार समर्थन केले. त्यानंतर मध्यरात्री वक्फ दुरूस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झाले. यावेळी विधेयकाच्या बाजूने २८८ मते पडली तर विरोधात २३२ मते पडली. या मतदानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी अनुपस्थित राहिल्याचे पाहायला मिळाले.
केंद्रीय संसदीय मंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधेयक लोकसभेत मांडले. त्यानंतर यावर चर्चा सुरू झाली. कॉंग्रेस, सपासह विरोधी पक्षातील सदस्यांनी या विधेयकाला जोरदार विरोध केला. खा. असदुद्दीन ओवेसी यांनी तर या विधेयकाला विरोध करीत विधेयकाची प्रत फाडून ते निघून गेले. तसेच वक्फवर दोन बिगर मुस्लिम सदस्य असतील, तर हिंदू देवतांच्या ट्रस्टवर मुस्लिम का नाही, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.
यावेळी अमित शाह यांनी मी या विधेयकाला समर्थन देण्यासाठी उभा आहे. दुपारी १२ वाजल्यापासून सुरू असलेली चर्चा मी ऐकत आहे. काही सदस्यांच्या मनात गैरसमज आहेत. काही जण राजकीय फायद्यासाठी समाजात चुकीची माहिती पसरवत आहेत. हा कायदा मुस्लिम बांधवांच्या धार्मिक कामात आणि त्यांनी दान केलेल्या संपत्तीत हस्तक्षेप करतो, असा गैरसमज पसरवला जात आहे. अल्पसंख्याकांना घाबरवून मतांची बँक तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण वक्फमध्ये कोणत्याही गैर-मुस्लिमाची नेमणूक होणार नाही. धार्मिक संस्थांच्या व्यवस्थापनासाठी गैर-मुस्लिमांना नियुक्त करण्याचा कोणताही विचार नाही, असे म्हटले.