शांतता आणि सौहार्द बिघडवू नका, खरगे यांचा हल्लाबोल
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारने राज्यसभेत मांडलेले वक्फ सुधारणा विधेयक हे घटनाविरोधी आहे. केंद्र सरकारने देशातील शांतता आणि सौहार्द बिघडू देऊ नये. यातून देशात वाद निर्माण होईल. त्यामुळे सरकारने वादाचे बिज पेरू नये. त्यासाठी सरकारने हे विधेयक मागे घेऊन आपली चूक सुधारावी, असे आवाहन राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केले. वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध करीत त्यांनी कॉंग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
वक्फ सुधारणा विधेयक बुधवारी रात्री लोकसभेत मंजूर झाल्यानंतर गुरुवारी केंद्रीयमंत्री किरण रिजिजू यांनी आज राज्यसभेत हे विधेयक मांडले. यावेळी त्यांनी सद्यस्थितीत ८.७२ लाख वक्फ मालमत्ता आहेत. २००६ मध्ये सच्चर समितीने ४.९ लाख वक्फ संपत्तीमधून १२ हजार कोटी रुपयांच्या कमाईचा अंदाज लावला होता. याचा विचार करता आज किती उत्पन्न येत असेल. त्यामुळे सर्वच पक्षांनी या विधेयकाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले. त्यानंतर इतर सदस्यांनी आपापल्या पक्षाची भूमिका मांडली.
राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवत माफी मागण्याची विनंती केली. अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत वादग्रस्त वक्तव्य केले होते. या मुद्यावरून आज राज्यसभेत गदारोळ झाला. ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी कधी लव्ह जिहाद, कधी फ्लड जिहाद, कभी यूसीसी असे मुद्दे उपस्थित करून मुस्लिम मुद्यावरून देशात चर्चा घडवून आणून वाद निर्माण करायचा आणि राजकीय डाव साधायचा, असा भाजपचा डाव असल्याचा आरोप केला.
खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली. केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संजय राऊत यांनी तुम्ही (भाजप) खुश दिसत आहात, पण मुसलमानांची इतकी काळजी तर पाकिस्तानच्या मोहम्मद अली जिन्नांनाही नव्हती. जिन्नांचा आत्मा उठून तुमच्यात बसला आहे का, त्यांच्या या टीकेमुळे सभागृहात गोंधळ उडाला.
दुसरीकडे विधेयकाचे समर्थन करताना भाजप नेते जे. पी. नडड्डा यांनी सरकार लोकशाही मापदंडाचे पालन करीत असल्याचे म्हटले. त्यातच बिजदने ऐनवेळी सत्ताधा-यांना अनुकूल भूमिका घेत थेट पक्षाच्या खासदारांना मतदानाच्या निर्णयाचे स्वातंत्र्य दिले. त्यामुळे विरोधकांना धक्का बसला आहे.
विधेयकाविरुद्ध डीएमके
सुप्रीम कोर्टात जाणार
वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध करीत विरोधी पक्षातील डीएमकेने या विरोधात आपण सुप्रीम कोर्टात जाणार आहे, असे म्हटले आहे. आज डीएमके खासदारांनी राज्यसभेत काळी पट्टी बांधून या विधेयकाला विरोध केला.
जयदूयमध्ये नाराजी
जदयूने वक्फ विधेयकाचे समर्थन केल्याने नेत्यांमध्ये नाराजी वाढली आहे. यातून जदयूचे वरिष्ठ नेते मोहमद कासिम अन्सारी यांनी पक्षाच्या भूमिकेचा निषेध करीत पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. मी अनेक वर्षांपासून पक्षात काम केले. परंतु सध्याची पक्षाची भूमिका पाहता आपण नाराज असल्याचे ते म्हणाले.